महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रेडर मनमानी करतील तर कारवाई करणार - सदाशिव खोत गुरुवार, २५ जानेवारी, २०१८
• सातबाऱ्यावर तूर पिकाची नोंद नसल्यास तलाठ्याचा दाखला ग्राह्य मानावा
• ‎15 फेब्रुवारी पर्यंत शेतात पऱ्हाटी राहता कामा नये.

वर्धा :
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल स्वीकारल्यानंतर तो खरेदी केलाच पाहिजे. माल स्वीकारल्यानांतर मालाच्या दर्जाबाबतनंतर ग्रेडर मनमानी करीत असतील तर त्यांचा अहवाल पाठवावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश कृषी व फलोत्पादन, पणन व पाणीपूरवठा राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दिले.

एकदा स्वीकारलेला माल नंतर चांगला नाही म्हणून शेतकऱ्यांना परत करायचा आणि त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसायचा. यापुढे शेतकऱ्यांना असे नुकसान सोसावे लागू नये म्हणून नाफेड आणि खरेदी केंद्रावर एकच ग्रेडर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विकास भवन येथे आयोजित कृषी व फलोत्पादन, पणन व पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेश्राम, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दिलीप वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते.

जिल्हा उपनिबंधक यांनी सर्व ग्रेडरची बैठक घ्यावी. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्याना तूर खरेदी करण्यासाठी परवानगी देऊन प्रोत्साहित करावे. या हंगामात ऑनलाईन तूरीची नोंदणी गतिशील करावी. तुरीची नोंदणी करताना शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तूर पिकाची नोंद नसेल तर तलाठी यांनी तूर पिकाचा दाखला द्यावा. तलाठ्यांना तसे दाखले देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तात्काळ द्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्यात. तसेच शेतकऱ्यांनी सातबारा व तलाठ्याचा दाखला सोबत ठेऊन तूर विक्रीसाठी न्यावी, असे आवाहन केले.

यावर्षी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील वर्षी यापेक्षा जास्त प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शेतात पऱ्हाटी राहता कामा नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पऱ्हाटी उपटण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करावी. कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेऊन मिशन मोडवर हे काम करावे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला दर मिळावा यासाठी संत शिरोमणी सावता माळी बाजार योजना सुरू केली. पण वर्धा जिल्ह्यात एकाही ठिकाणी असा बाजार सुरू न केल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासाठी जिल्हाधिकारी आणि पणन विभागाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांनी नगर परिषद क्षेत्रात बाजारासाठी जागा मिळवून तातडीने बाजार सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. शेतमाल तारण कर्ज योजना चांगली असून याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यामुळे शेतकऱ्यांना वाढलेल्या बाजारभावाचा फायदा मिळेल, असेही श्री.खोत यावेळी म्हणाले

जिल्ह्यातील कृषी महोत्सव चांगल्या पद्धतीने आयोजित करावा हे सांगताना ते म्हणाले, कृषी महोत्सवात कृषी माल प्रक्रिया, टेक्सटाईल कंपन्या, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, खादी ग्रामोद्योग, व जिल्हा उद्योग केंद्रासोबतच शेतीशी निगडित शासकीय व खाजगी कंपन्यांचा सहभाग घ्यावा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, हवामान केंद्र, गटशेती आदींचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result