महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समाधान मेळावे उपयुक्त ठरतील - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत रविवार, ३० जुलै, २०१७
सांगली : राज्य शासनाने सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थी पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाधान मेळावे उपयुक्त ठरतील, असा विश्वास कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केला.

महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत आष्टा येथे आयोजित विस्तारीत समाधान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. श्रीराम सांस्कृतिक हॉल येथे आयोजित या कार्यक्रमासाठी आमदार शिवाजीराव नाईक, आष्टा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्नेहा माळी, उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे, वाळवा तालुका कृषि अधिकारी बी.डी. माने, वैभव शिंदे, सागर खोत आदी उपस्थित होते.

वाळवा तालुक्यातील अनेक गावांत रस्ते, पाणीपुरवठा योजना अशा अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, विस्तारीत समाधान योजना मेळाव्याच्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध प्रकारचे दाखले नागरिकांना मिळत आहेत. यामध्ये शिधापत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलिअर दाखला, आदिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, अशा अनेक दाखल्यांचा समावेश आहे. जनतेचे समाधान करण्याचा हा एक नाविण्यपूर्ण उपक्रम असून या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. शासन तळागाळातल्या सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहे. राज्यातील सततच्या दुष्काळी व नापिकीच्या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी निर्माण करण्यासाठी शासनाने ऐतिहासीक असा कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. आष्टा तालुका करण्यासाठी तसेच आष्टा येथील घरकुल योजनेबाबतच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून शासन आणि जनता यांनी एका विचाराने काम केले तर निश्चितच विकास होऊ शकतो.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य माणसाला दिलासा मिळावा, लोकांना काम मिळावे ही केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. या समाधान मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती स्वत: घेण्याबरोबरच ती आपल्या आसपासच्या सर्व नागरिकांना देऊन या योजनांचा लाभ घ्यावा. शासकीय यंत्रणेबरोबर समन्वय साधून कामे करून घ्यावीत. मुद्रा बँक योजनेंतर्गत विनातारण कर्ज उपलब्ध होते. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरी हा एकच पर्याय नाही, तर व्यवसाय कौशल्य शिक्षण आत्मसात करून उद्योगधंदे उभा करून त्यामध्ये इतरानांही काम मिळावे असे ध्येय ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत आष्टा येथील लाभार्थी नरेंद गुडमेमाळी यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप, रेशन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर दाखले आदींचे वाटप करण्यात आले. विविध विभागाकडील 648 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र/लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांनी समाधान मेळाव्यात लावण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉलची पाहणी केली.

या मेळाव्यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची व कर्जमुक्ती योजनेबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच या मेळाव्यात कृषि विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, सहायक निबंधक सहकारी संस्था, भूमि अभिलेख, आपले सरकार सेवा केंद्र, पशुसंवर्धन आदी विभागांकडील माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. ग्रामीण आरोग्य विभाग आष्टा यांच्यामार्फत रक्तातील साखर प्रमाण तपासणी करण्यात आली. तसेच एच.आय.व्ही. आजाराची तपासणी करण्यासाठी रक्त नमुने घेण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. आभार महसूल नायब तहसीलदार शैलजा पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन पंडीत चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result