महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पीक कर्ज, विमा योजनेचा जास्तीतजास्त लाभ मिळावा - पालकमंत्री एकनाथ शिंदे बुधवार, ११ एप्रिल, २०१८
जिल्ह्यात भाजीपाला वाढविण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन द्या

ठाणे :
ठाणे जिल्ह्यात बारमाही शेती झाली पाहिजे विशेषत: भेंडी, ढोबळी, कारली अशा विविध भाज्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे, शहरांमधील गृहसंकुलांमध्ये शेतीतील भाजीपाला थेट विकण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना देखील वाहतुकीच्या दृष्टीने काही सवलती द्याव्यात, पीक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा अशा विविध सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

ते आज नियोजन भवन येथे कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार सुभाष भोईर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, कृषी सभापती उज्ज्वला गुळवी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, मुख्य वन संरक्षक किशोर ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, विभागीय कृषी अधिकारी अंकुश माने यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना निर्यातीचे तंत्र समजवावे
पालकमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे. याशिवाय भाज्यांचे क्षेत्रही वाढवून शेतकऱ्यांना निर्यातीचे तंत्र समजावून सांगण्यासाठी कृषी अधिक प्रयत्न करावेत. केवळ भात, नागली, वरई ही पिके न घेता रब्बी हंगामाचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

पीककर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा
गेल्या वर्षी २०५ कोटी पीककर्जाचे उद्दिष्ट्य असताना १३५ कोटी वाटप झाले, यंदा २२५ कोटींचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे ते साध्य झाले पाहिजे, असे नियोजन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसे समाविष्ट करून घेता येईल हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गाळ उपसण्यासाठी खासगी संस्थांची मदत घ्या
गाळ उपसणे, बंधारे बांधणे, नाल्यांचे रुंदीकरण अशा कामांमध्ये खासगी संस्था आणि कंपन्यांचा सहभाग वाढवून मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे हाती घ्यावीत जेणे करून पाणीसाठे वाढतील असे सांगून पालकमंत्री यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खरड येथील तलावातील तसेच कल्याण जवळील वाकळण तलावातील गाळ काढल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा फायदा झाला ते सांगितले. यंदा देखील वनराई बंधाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे व शेततळ्यांची कामे झाली पाहिजेत असे ते म्हणाले.

कीटकनाशके, बियाणे यांचा पुरेसा पुरवठा करा
खरीप हंगामापूर्वी म्हणजे १५ ते २० मे पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे, किटकनाशके मिळतील हे पाहण्याचे तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा फायदा इतरांना कसा मिळेल यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका, भाजीपाला मिनीकीटचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या घडीपत्रिकांचे देखील लोकार्पण झाले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची लागवड करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांमार्फत योग्य ती मदत केली जाईल तसेच भरारी पथकेही लक्ष्य ठेऊन आहेत असे सांगितले. पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तात जास्त शेतकऱ्यांना समाविष्ट करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी देखील जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.

शेतीचे उत्पन्न दुपटीपेक्षा अधिक वाढविणार
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे एस घोडके यांनी सादरीकरण करून २०२२ पर्यंत जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न दुपटीपेक्षा अधिक वाढविण्याचे नियोजन करीत असल्याची माहिती दिली तसेच सादरीकरण केले. शेवटी कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी आभार मानले. संचालन डॉ तरुलता धानके यांनी केले.

सादरीकरणातील ठळक मुद्दे
• जिल्ह्याचा सरासरी पाऊस 2517.8 मि.मी. असून सन 2017 मध्ये पडलेला पाऊस 3439.9 मि.मी. आहे.
• जिल्ह्याचे खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र: 65909 हेक्टर असून 2017 मध्ये लागवड क्षेत्र एकूण 59539 हेक्टर आहे. (90 टक्के)
• सन 2018-19 मध्ये 63905 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन.
• मुख्य पीक भात सर्वसाधारण क्षेत्र : 59279 हेक्टर.
• भात पिकाची सरासरी उत्पादकता : 2561 किलो/हेक्टर.
भात पिकाची 2017-18 ची उत्पादकता : 1960 किलो/हेक्टर .
• सन 2018-19 ची भात बियाणे मागणी : 10565 क्विंटल (बियाणे बदल - 45 टक्के ) सन 2017 -18 बियाणे विक्री 9772 क्विंटल.
• सन 2018-19 खताची मागणी 21690 मे.टन(सन 2017-18 मधील पुरवठा:10070 मे.टन)
• ठाणे जिल्ह्यात 146 बियाणे विक्रेते 193 खत विक्रेते व 119 किटकनाशके विक्रेते आहेत.
• जिल्ह्यात 1 पूर्ण वेळ व 17 अर्धवेळ निरिक्षक असे एकूण 18 गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे द्वारे 299 बियाण्यांचे, 150 खताचे व 88 किटकनाशकांचे नमुने काढण्यात आले.
• खते व किटकनाशके यांची उपलब्धता व गुणवत्ता याबाबत तक्रारीसाठी शेतकऱ्यांना टोल फ्री. नंबर 1800-233-4000 वर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
• सन 2017-18 मध्ये रुपये 9426.95 लक्ष पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.
• सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत 433 गावातील 7823 नमुने काढुन तपासण्यात आले. 32741 शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले.
• सन 2017-18 मध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत जिल्ह्यात एकूण 107 पॉवर टिलर 55 ट्रॅक्टर, 9 रोटॅव्हेटर, 2 कल्टीव्हेटर, 1 रिपर व 1 थ्रेशर असे एकुण 175 यंत्र व कृषि औजारे वाटप करण्यात आले.
• सन 2017-18 मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये जिल्ह्यात 75 शेतकऱ्यांच्या 67.04 हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संच बसविण्यात येऊन रू.13.82 लाख अनुदान शेतकऱ्यांचे खात्यावर वाटप करण्यात आले.
• जिल्हा कृषि महोत्सव ठाणे येथे दि.11 ते 15 मार्च 2018 मध्ये आयोजन करण्यात आला. महोत्सवात रु.90.63 लाखाची उलाढाल शेतमाल विक्रीतून झाली.

सन 2018-19 मध्ये राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपुर्ण बाबी
• जिल्हा कृषि महोत्सव - सन 2018-19 मध्ये ठाणे येथे आयोजित करण्याचे नियोजन आहे.
• शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री 2018-19 मध्ये इच्छुक शेतकरी गटांना थेट विक्रीकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत 5 जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन.
• राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत सन 2018-19 मध्ये 433 गावांतील 8780 नमुने काढण्याचे लक्षांक आहे.
• सन 2018-19 मध्ये रुपये 22500 लक्ष पीक कर्जाचे वितरण करण्याचे लक्षांक.
• खते व किटकनाशके यांची गुणवत्ता सुधारणासाठी सन 2018-19 करिता 299 बियाण्यांचे, 169 खताचे व 82 कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे लक्षांक.
• उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत सन 2018-19 मध्ये 200 पॉवर टिलर व 60 ट्रॅक्टरचे लक्षांक ठेवण्यात आलेले आहे.
• प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये सन 2018 -19 करिता 150 हे. क्षेत्रावर संच बसविण्याचे नियोजन आहे.
• शेडनेट हाउस उभारणी - सन 2018-19 मध्ये 10 शेडनेट हाऊस उभारणीचे नियोजन.
• हरितगृह उभारणी - सन 2018-19 मध्ये 05 हरितगृह निमिर्तीचे लक्षांक
• प्लॅस्टीक मल्चींग - सन 2018-19 मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत भेंडी व कलिंगड पिकाकरिता 150 एकर क्षेत्रावर आच्छादनाचे नियोजन.
• वनपट्टे धारकांचा विकास - जिल्ह्यात 5150 वनपट्टे धारक असून 3193 हेक्टर वनपट्टे दिलेले आहेत. याअंतर्गत 232 लाभार्थ्याची 92.70 हे. वर मजगी, 296 लाभार्थ्याची 202.60 हेक्टर जुनी भात शेतीची कामे करण्यात आली. सन 2018-19 मध्ये वनपट्टेधारकांना शतकोटी वृक्ष लागवड, फुलशेती,भाजीपाला लागवड, बांधावर तूर, शेवगा लागवड, मजगी जुनी भात शेती इ. बाबींचा लाभ देण्याचे नियोजित आहे.
• व्हेजनेट/मँगोनेट - राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत 2017-18 मध्ये मँगोनेट /व्हेजनेट अंतर्गत 320 भेंडी उत्पादक(244 हे.) व 19 आंबा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणीकरुन त्यांना निर्यातक्षम भाजीपाला उत्पन्नाचे तंत्रज्ञान देण्यात आले.
• एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत 14 सामूहिक शेततळयाचे नियोजन.
• महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 2018-19 मध्ये 3000 हेक्टर फळबाग लागवडीचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.
• मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत 300 शेततळे पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
• समृध्द जनकल्याण योजनेतंर्गत नाडेप, गांडूळ खत, शेततळी, फळबाग लागवड इ. बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.
• आत्मा योजनेतून नाविण्यपूर्ण प्रकल्पातंर्गत कुक्कुटपालनासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देशी जातीच्या (कडकनाथ, वनराज, गिरीराज) कोंबड्यांच्या पिलांचे वाटप संसद आदर्श गावांमध्ये करण्यात येणार आहे.
• राज्यअंतर्गत प्रशिक्षणासाठी हॉटिर्कल्चर सेंटर, तळेगाव दाभाडे येथे 2018-19 मध्ये 100 शेतकऱ्यांना हरितगृह व शेडनेट हाऊस तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे.
• सन 2018-19 मध्ये ठाणे जिल्ह्यातील 200 शेततळ्यामध्ये 120 मत्स्यबीज सोडणे प्रस्तावित आहे.
• आत्मा योजनेतंर्गत सन 2018 - 19 मध्ये 4000 भाजीपाला मिनीकिट पॅकेटांचा महाबीजमार्फत पुरवठा करणे प्रस्तावित आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result