महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नाट्यसभागृहे आनंददायी विकासाचे केंद्र व्हावीत : पालकमंत्री शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९


आयएसओ अंगणवाडी मधील विद्यार्थी समाजामध्ये आनंद निर्माण करतील...

नाट्यगृहाचा लोकार्पण तसेच अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण सोहळा...

चंद्रपूर :
नाट्यगृहे, सभागृहे म्हणजे नुसत्या विटा सिमेंटच्या भिंती नसून भविष्यातील संवादाची केंद्र व्हावीत. माणसामाणसांमध्ये प्रेम निर्माण करणारी, विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन करणारी, व्यवसाय, शेती, उद्योगांचे प्रशिक्षण देणारी केंद्र व्हावीत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित बल्लारपूर येथील नाट्य सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, मुख्याधिकारी विपिन मुग्धा तसेच नगरपरिषदेचे नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची ९० टक्के बुद्धिमत्ता ही वयाच्या सहा वर्षापर्यंत तयार होते. उर्वरित १० टक्के बुद्धिमत्ता सहा वर्षानंतर निर्माण होते. म्हणून विद्यार्थ्यांना सहा वर्षापर्यंत दिले जाणारे शिक्षण उत्तम वातावरणात दिले जावे. याकरिता बल्लारपूर मतदारसंघात तसेच जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी आनंदवाडी म्हणून ओळखली जावी. त्यातून घडलेला विद्यार्थी समाजामध्ये आनंद निर्माण करेल. या दृष्टिकोनातून अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळावा याकरिता पुरेपूर प्रयत्न केले, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्ह्याच्या विकास होण्यासाठी शक्तीनिशी प्रयत्न करत असून या बल्लारपूर मतदारसंघासोबतच संपूर्ण जिल्हा गॅसयुक्त करून धूरमुक्त जिल्हा लवकरच घोषित होणार आहे. तसेच या भागातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे. याकरिता आरओयुक्त मतदार संघ निर्माण केला. बल्लारपूर शहरातील प्रत्येक वार्डात आरओ मशीन लावण्यात येणार असून त्याकरिता निधी उपलब्ध झाला आहे. महिलांकरीता रोजगार निर्माण व्हावा. याकरिता बचत गटामार्फत आर्थिक अभियान सुरू करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात सुषमा स्वराज महिला उद्योग भवन उभारण्यात येणार आहे. बल्लारपूर शहरात भव्य बसस्थानक निर्माण करण्यात आली असून नवीन बसस्थानकात ५० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बेघर मुक्त भारत निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बेघर व्यक्तीला घर उपलब्ध करून देण्यात येईल, असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शाळेला बोलकी संरक्षक भिंत निर्माण करण्यात येणार आहे. बल्लारपूर शहरात आकर्षक नाट्यसभागृह निर्माण करण्यात आले असून या सभागृहाच्या माध्यमातून प्रगती साधली जावी. हे सभागृह आनंदाला जन्म देणारे ठरावे. यात आचार विचारांची देवाण-घेवाण व्हावी. अभ्यासकांची अभ्यासपूर्ण भाषण या सभागृहात दिली जावी. ही भव्य दिव्य वास्तू बल्लारपू येथील नागरिकांची आहे. या वास्तूचा सत्कार्यासाठी वापर व्हावा, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जेव्हा आमचे मंत्री कार्यालय आयएएओ झालेले देशातील पहिले कार्यालय ठरले. तेव्हा जिल्ह्यातील अंगणवाड्या सुद्धा आयएसओ व्हाव्या, असा संकल्प केला. या घडीला जिल्ह्यात 583 तर बल्लारपूर मतदारसंघात ४०३ अंगणवाड्या आयएसओ दर्जा प्राप्त झाल्या आहे. हा एक चंद्रपूर जिल्ह्याचा विक्रमच आहे. या अंगणवाड्यांमध्ये ज्या सेविका काम करतात. त्यांच्या माध्यमातून देशाची उज्वल पिढी घडावी. सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी भव्य नाट्यसभागृहाच्या निर्मितीकरिता परिश्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बल्लारपूर मतदारसंघ क्षेत्रातील आयएसओ प्राप्त अंगणवाडी सेविकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बल्लारपूर शहरातील नागरिक तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result