महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा परिषद निवडणूक: पेड न्यूजच्या बाबत काटेकोरपणे कार्यवाही व्हावी - जिल्हाधिकारी शनिवार, ०२ डिसेंबर, २०१७
ठाणे : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत पेड न्यूज संदर्भात नियमांप्रमाणे काटेकोर कारवाई व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, राज्य उत्पाद शुल्क, पोलीस तसेच बँकांनी देखील याबाबत सतर्क राहावे, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

पेड न्यूज तक्रारींसंदर्भात कार्यवाहीसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची बैठकही जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या समितीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ग्रामीण, उपजिल्हाधिकारी (रोहयो), निवडणूक निर्णय अधिकारी - शहापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, प्रेस कौन्सिलचे सदस्य श्री. रामकृष्णन हे सदस्य तसेच जिल्हा माहिती अधिकारी सदस्य सचिव असतील

पेड न्यूज म्हणजे काय?
काही राजकीय पक्ष निवडणुकांच्या काळात वृत्तपत्रांत बातम्यांच्या स्वरूपात जाहिराती प्रसिद्ध करतात, त्या वरकरणी बातम्या दिसत असल्या तरी त्याची किंमत मोजलेली असते. एखाद्या उमेदवाराने किंवा त्याच्या समर्थकाने अशी पेड न्यूज दिली, असे सिद्ध झाले तर त्यासाठी आलेला खर्च त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सामविष्ट केला जातो. पेड न्यूज बाबत तक्रार आल्यास संबंधित जिल्हा समिती त्या उमेदवाराकडून तसेच प्रसार माध्यमाकडून खुलासा मागविते. या समितीने दिलेल्या निर्णयावर अपिलाची तरतूद नाही. पेड न्यूज ही संकल्पना केवळ मुद्रित माध्यमांसाठी लागू आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रचारासाठी नियम
इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रचारासाठी प्रारंभी हे प्रसिद्धी साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात गठीत केलेल्या सर्टीफिकेशन समितीकडून तपासून त्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result