महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन, पालकमंत्री यांच्याहस्ते आदेशाचे वाटप सोमवार, ०१ जानेवारी, २०१८
सांगली : सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. वांग मराठवाडी 116 प्रकल्पग्रस्तांना आणि कोयना अभयारण्य 45 प्रकल्पग्रस्तांना अशा एकूण 161 प्रकल्पग्रस्तांना 14 हेक्टर 18 आर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने उत्तम काम केले आहे, असे प्रशंसोद्गार पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे काढले.

सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यातील खानापूर व कडेगाव तालुक्यात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज जमीन वाटप आदेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि.ना.काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्मिता कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी घोटील बाधीत गावातील काळू विठू कांबळे, आनंदा तुकाराम गायकवाड, धनाजी शंकर कांबळे, सुरेश जगन्नाथ कांबळे, जयाराम रामू कांबळे, म. वा. जयवंत, सुशिल व चित्रा जयराम कांबळे, मिलींद जगन्नाथ कांबळे, तानाजी रामू कांबळे या प्रकल्पग्रस्तांना कडेगाव तालुक्यातील कोतिज येथील, उमरकांचन बाधीत गावातील मारूती बाळू मोहिते, दत्तात्रय म. वा. विष्णू मारूती मोहिते एकूम्या, अशोक आबासो मोहिते, चंद्रकांत गणपती मोहिते या प्रकल्पग्रस्तांना खानापूर तालुक्यातील आळसंद येथील जमीन वाटप आदेश प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या इच्छेनुसार पुनर्वसन केल्यामुळे ऋणनिर्देश व्यक्त केले. काही प्रकल्पग्रस्तांनी मनोगत व्यक्त केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result