महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव रविवार, १९ मे, २०१९


धुळे : जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून दुष्काळजन्य परिस्थितीत प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवदेनशील राहून टंचाई परिस्थिती हाताळावी, व नागरिकांना पिण्याचे पाण्यासह जनावरांना चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम या प्राधान्याने काम करण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालक सचिव तथा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्याचे पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली दुष्काळी परिस्थिती आणि टंचाई संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रातांधिकारी भिमराज दराडे (धुळे), विक्रांत बादल (शिरपूर), गोविंद दाणेज, (रोहयो ), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुधाकर शिरसाठ, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.तडवी, यांच्यासह सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा या ठिकाणी दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहिर करण्यात आली असून धुळे व शिंदखेडा येथे गंभीर स्वरुपाचा तर शिरपूर येथे मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर असून साक्री तालुक्यातील 10 सर्कल मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहिर केली आहे. जिल्ह्यात 48 गावे, 6 वाड्यामध्ये 36 टँकर सुरु आहे. त्यात शासकीय 17, तर 19 खाजगी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणी टंचाई दूर होण्यासाठी टंचाईग्रस्त गावातील टँकरच्या फेऱ्या वाढविणे, तात्पुरत्या नळ पाणी योजना घेणे, खाजगी विहीर अधिग्रहीत करणे यासारख्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे त्या गावांमध्ये सुरु असलेल्या टँकरच्या फेऱ्या वाढविण्या बरोबरच या गावांमध्ये बोअरवेल घेण्याबाबत परिस्थिती जाणून घ्यावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता त्यांना चाऱ्याची टंचाई भासणार नाही या प्रमाणे प्रशासनाने उपाययोजना केलेली आहे. तथापी पावसाचे आगमन उशिरा झाल्यास धुळे व शिंदखेडा तालुक्यात चारा टंचाई उद्भवू शकते यावर तातडीने उपाययोजना करता याव्यात यासाठी चारा छावण्यांचे ठिकाण आत्ताच निश्चित करावेत. ठिकाणांची निश्चिती करतांना पुरेशी जागा व पाण्याची उपलब्धता यास प्राधान्य देण्यात यावे. जनावरांना चाऱ्याचे नियोजन करतांना जुलै अखेर पर्यंत पुरेल असे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता मागेल त्याच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेतंर्गत कामे उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्ह्यात मागणी आल्यास प्रत्येक गावांमध्ये कामे उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी जिल्ह्यात 21 हजार 643 कामे सेल्फवर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी यावेळी सांगितले.

या बरोबरच शासनाकडून प्राप्त झालेले खरीपातील दुष्काळी अनुदानाचे 100 टक्के वाटप करावे, पिण्याचे पाण्यासाठी आरक्षण, जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास प्रतिबंध, वैरण विकास योजनेतून दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्यांचे नियोजन, या सर्व बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

जिल्ह्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत सर्वेक्षण केलेल्या तलावामध्ये वनक्षेत्रावरील तलावांची संख्या जास्त आहे. या तलावातील गाळ शेतजमीन सुधारण्यासाठी स्वखर्चाने वाहतुक करण्यास शेतकरी तयार आहेत. तथापी वनविभागाकडील निर्देशानुसार सदरचा गाळ वनेत्तर क्षेत्रात वापरण्यास परवागनी नसल्याने केवळ वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी यांनाच परवानगी आहे परंतु या आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक क्षमतेमुळे वनविभागातील तलावातील गाळ वाहतुकीचा खर्च त्यांना परवडणारा नाही. तसेच काढलेला गाळ वनक्षेत्रात पसरविण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी वनक्षेत्रातील तलावांचे खोलीकरणासह पाणीसाठा वाढविणे शक्य होत नाही. याबाबत वनेत्तर शेतजमीन सुधारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सुचनाही पालक सचिव श्रीवास्तव यांनी यावेळी दिल्या.

याबरोबरच दुष्काळी भागात पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर आवश्यकता भासल्यास गुन्हे दाखल करून पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सरपंचांशी ऑडीओ ब्रीजव्दारे साधलेल्या संवादावर तातडीने उपाय योजना करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रधानमंत्री सन्मान योजना व दुष्काळी अनुदानाचे वाटप, प्रधानमंत्री पिक विमा योजना आदि योजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. त्याच बरोबर नागरी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतांना त्यांनी धुळे म.न.पा.सह शिंदखेडा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा या नगर पालिका क्षेत्रातील पाणी परिस्थितीचाही आढावा घेतला. टंचाई व दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्याचे जे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांचा तातडीने पाठपुरावा करून मंजूरी देण्यासाठी प्रयत्नशिल राहू असेही पालक सचिव श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result