महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी भरीव योगदान द्यावे - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७
बीड : शासनाने मागील तीन वर्षात राज्यातील जनतेसाठी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजनेसारखी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यासह समाजातील सर्व घटकांना झाला आहे. देशाच्या विकासासाठी तसेच भविष्यात चांगली चारित्र्य संपन्न पिढी निर्माण झाली पाहिजे. त्यादृष्टीने शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई यांच्यावतीने माजलगाव येथे सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ व त्रैवार्षिक शिक्षण शिबीर समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार आर. टी. देशमुख, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, नितीन शेटे, विद्यासभेचे अध्यक्ष प्रा.सतीश पत्की, अमरनाथ खुरपे, डॉ. हेमंत वैद्य, प्रकाश दुगड, प्रा.डॉ.शंकरराव लासूने, डॉ. दिगंबर जोशी, राधेशाम लोहिया, नगराध्यक्ष सहाल चाऊस, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

महसूलमंत्री श्री.पाटील म्हणाले की, ग्रामीण भागासह शहरी भागातील 10 हजार विद्यार्थ्यांना स्वत:चा उद्योग उभारणीसाठी प्रत्येकी 10 लाखाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून या कर्जातून त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु करावा व इतरांना उद्योगामध्ये कामे उपलब्ध करुन द्यावीत. मुद्राबँक योजनेच्या माध्यमातून तरुणांना विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात तरुणांना होत आहे. तसेच किमान कौशल्यावर आधारीत तरुण तरुणींना विविध कोर्स उपलब्ध करुन देण्यात आले असून तरुणांनी या कोर्समध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे व स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा.

मागील दोन तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे अर्थिक चित्र बदलत आहे. आजच्या आधुनिक जगात दररोज होत असलेल्या नवनवीन घडामोडींची माहिती शिक्षकांना असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच नवनवीन माहिती शिक्षकांनी आत्मसात करुन त्याची माहिती विद्यार्थ्यांना करुन देणे आवश्यक आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे त्याचबरोबर तो चारित्र्य संपन्न विद्यार्थी होण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे सांगून भविष्यातील चारित्र्य संपन्न पिढी निर्माण होण्यासाठी सर्व शिक्षकांसह समाजातील घटकाचे योगदान महत्वाचे आहे, असेही महसूलमंत्री चद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार आर.टी.देशमुख बोलतांना म्हणाले की, सिद्धेश्वर विद्यालयाने आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी दिले आहेत. माजलगाव परिसर व ग्रामीण भागातील पालक या शाळेत प्रवेशासाठी आग्रही असतात. या शाळेत प्रवेश मिळाले की पालकांमध्ये समाधान असते. शाळेचे प्रशासन चांगले असल्यामुळे शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे. या शाळेतील विद्यार्थी अनेक क्षेत्रात नावलौकीक मिळविले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र आलुरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दर तीन वर्षानी अशाप्रकारचे शिबीर घेण्यात येते. या शिबीरामध्ये अनेक बाबीवर चिंतन होते. या शिबीरामध्ये संस्थेच्या सर्व शाळेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो तसेच या तीन दिवसात करण्यात आलेल्या कामाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी नितीन शेटे, अमरनाथ खुरपे, संतोष भटकर यांचीही समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश गटकळ यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result