महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घरकुल- सुभाष देशमुख शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७
सांगली : स्वत:चे घरकुल प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरावे व प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घरकुल मिळावे हे केंद्र व राज्य शासनाने धोरण असून प्रधानमंत्री आवास योजनंेतर्गत सन 2022 पर्यंत गरीब कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे घरकुल बांधकामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात आज 136 घरकुलांच्या बांधकामाचे भूमीपूजन संपन्न होत आहे. ही बाब सांगलीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सांगली येथे संजयनगर येथील सर्व्हे क्रमांक 215/3 मध्ये बांधण्यात येत असलेल्या सदनिका बांधकामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, माजी उपमहापौर शेखर इनामदार, निता केळकर, गोपीचंद पडळकर, म्हाडाचे उपअभियंता पी. पी. गायकवाड आदि उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, प्रधानमंत्री यांची सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही संकल्पना स्त्युत्य आहे. नागपूर येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांच्या भूमीपूजन समारंभ प्रसंगी महाराष्ट्रासाठी अनेक प्रकल्प मा. प्रधानमंत्री यांनी दिले, याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो असे सांगून ते म्हणाले, सांगलीत बांधण्यात येणाऱ्या बांधकामांचे काम उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे. या योजनेंतर्गत काम पूर्णत्वाची मुदत 18 महिन्याची जरी असली तरी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शुभारंभ झालेल्या घरकुलांच्या चाव्या लाभार्थ्यांना पुढील वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी देण्यात याव्यात. यासाठी प्रशासनाने व कंत्राटदारांनी कामाचा दर्जा टिकवून गतीने काम करावे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न सत्यात उतरेल, हीच त्यांना आजच्या दिनाची मानवंदना ठरेल, असे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.

या प्रकल्पाचा बांधकाम खर्च 12 कोटी 95 लाख रूपये असून या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी केंद्र शासनाचे 1.50 लाख व राज्य शासनाचे 1 लाख रूपये अनुदान आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत व अल्प उत्पन्न गट लाभार्थींसाठी 3 लाख ते 6 लाख पर्यंत आहे. या अभियानांतर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरूष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील व तसेच जर कर्ती महिला सदस्य नसेल त्या ठिकाणी कर्ता पुरूषांच्या नावे घर राहील. लाभार्थी कुटुंबामध्ये पती, पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल. केंद्राकडून अनुदान / सहाय्य प्राप्त करून घेण्याकरिता देशातील कोणत्याही भागात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीचे पक्के घर नसावे. लाभार्थीची पात्रता प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या मार्गदर्शक सुचनानुसार राहील.

यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सदनिका बांधकाम कोनशिला अनावरण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result