महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बावनथडी प्रकल्प : शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्या - पालकमंत्री गुरुवार, २४ जानेवारी, २०१९


तुमसर उपविभागीय आढावा बैठक

भंडारा :
बावनथडी प्रकल्पात शेती गेलेल्या काही शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. अशा ८५२ शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मागेल त्याला सौर कृषि पंप व मागेल त्याला वीज कनेक्शन ही योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक उपविभागीय क्षेत्रात पालकमंत्री शेतपांदन रस्ते योजना प्राधान्याने राबवून शंभर किलोमिटर रस्त्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

तुमसर येथे उपविभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपवन संरक्षण विवेक होशिंग, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी सुभाष चौधरी, तहसीलदार गजेंद्र बालपांडे व जिल्हा परिषद तथा नगरसेवक उपस्थित होते.

टंचाई व सिंचनाच्या कामास प्राधान्य देण्यात यावे असे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंचन प्रकल्पातील कालव्यामध्ये साचलेला गाळ व कचरा प्राधान्याने काढण्यात यावा. बावनथडी प्रकल्पातील ८५२ शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याची बाब आमदार चरण वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर बोलताना पालकमंत्री यांनी कार्यकारी संचालक पाटबंधारे यांना तात्काळ मोबदला वाटप करण्याचे आदेश दिले. विशेष मेळावे आयोजित करुन मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बेटेकर बोथली प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढविण्यासाठीच्या प्रस्तावास शासनस्तरावरुन तात्काळ मंजुरी प्राप्त होणार आहे. यासोबतच सोरणा प्रकल्प वन विभागाकडून जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी निधी सुपूर्द केला असून या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेत खैरलांजी व पालोरा येथे ८ व २ मेगावॅटचे उपकेंद्रासाठी जमीन प्राप्त झाली असून वीज निर्मिती झाल्यानंतर यावर ३ हजार सौर कृषि पंप कार्य करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रालगत शासकीय जमीन उपलब्ध नसल्यास भाडे तत्वावर बगर उपजाऊ जमीन घेऊन सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत उपकेंद्र उभारण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या. ज्या ठिकाणी वीज पोहचू शकत नाही. अशा ठिकाणी सौर कृषि पंप देण्याची योजना शासनाची असून यासाठी ५ व ३ एपी चा डिसी पंप देण्यात येतो. या पंपाची मूळ किंमत ३ लाख ८५ हजार व २ लाख ५५ हजार आहे. मात्र शासन सबसिडीवर हे पंप अनुक्रमे ३८ हजार ५०० व २३ हजार ५०० रुपयात देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मागेल त्याला सौर कृषि पंप देण्यासाठी तालुकास्तरावर मेळावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये समावेश करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून या योजनेचा लाभ तुमसर व मोहाडी येथील ६९ हजार खातेदारांना मिळणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व सातबारा वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी बैठकीत दिले.

सर्वांसाठी घरे २०२२ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांजवळ ३ वर्षाची घर टॅक्स पावती असल्यास त्यांच्याकडून कुठलेही इतर पुरावे मागण्यात येवू नये, असे त्यांनी सांगितले. या कामाचा नियमित आढावा उपविभागीय अधिकारी यांनी घेण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर मोहाडी तालुक्यातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक प्रलंबित प्रश्न या बैठकीत त्यांनी मार्गी लावले.

या बैठकीत पाणीटंचाई, जलसंधारण आणि सिंचन, पालकमंत्री पादंन रस्ते योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते, सौर कृषि पंप, कर्जमाफी, पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अन्न सुरक्षा योजना व ग्रामरक्षक दल या विषयांचा आढावा घेण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result