महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खादीच्या उत्पादन व विक्रीला प्रोत्साहन देणार- देवेंद्र फडणवीस सोमवार, ०२ ऑक्टोंबर, २०१७
सेवाग्राम आश्रमातील सामुदायिक प्रार्थनेत सहभाग
सूत कताई करून महात्मा गांधीना विनम्र अभिवादन
गांधी फॉर टुमारो प्रकल्पाअंतर्गत सेवाग्राम आश्रमाचा विकास

वर्धा :
खादीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खादीच्या निर्मित्तीत मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात दिली.



मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. बापू कुटी येथे सामुदायिक प्राथनेत सहभागी झाले. तसेच चरख्यावर सूत कातून गांधीजींना विनम्र अभिवादन केले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलस्त्रोत व नदी विकास मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मटकर, सचिव डॉ.श्रीराम जाधव, ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.



खादीची मागणी वाढत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यामध्ये खादी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी खादी उत्पादनाच्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. रोजगारासाठी खादीचे सुलभ तंत्रज्ञान तसेच खादी पर्यावरणपूरक असल्यामुळे राज्य खादी ग्रामोद्योग तसेच राज्यातील खादी ग्रामोद्योग संस्थांची बैठक घेण्यात येईल त्यानंतर उत्पादनाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा आश्रम प्रतिष्ठानतर्फे करण्यात येईल. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत आश्रम परिसराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.



बचत गटाच्या उत्पादनांना प्रोत्साहन

ग्रामीण जीवननोन्न्ती अभियानाअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तयार करण्यात आलेल्या ट्रेडल पंप, पशुखाद्यासह विविध उत्पादनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. ट्रेडल पंपाच्या माध्यमातून विजेशिवाय परसबाग, फुल शेती तसेच छोट्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पंपाचा लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे सेवाग्राम आश्रम परिसरात बचत गटाच्या उत्पादनाची माहिती मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी माहिती घेतली. महिला बचत गटाकडून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. उमेद या संस्थेतर्फे बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बचत गटाच्या उत्पादनाची माहिती दिली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result