महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉल्बीमुक्तीकडून जलयुक्तकडे या विधायक उपक्रमाला साथ द्या- धीरज पाटील मंगळवार, ०५ सप्टेंबर, २०१७
विश्वश्री गणेश मंडळात आयोजित संवादपर्व कार्यक्रम

सांगली :
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या डॉल्बीमुक्तीकडून जलयुक्तकडे हा एक विधायक उपक्रम आहे. या उपक्रमाला नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मिरज येथील विश्वश्री गणेश मंडळात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मिरज निवासी नायब तहसीलदार शेखर परब, पोलीस निरीक्षक शेलार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, डॉ. मोनाली पाटील, डॉ. स्वप्नील चोपडे, महानगरपालिका दवाखान्यातील अलका खोत, चंद्रकांत हुलवान, शिवाजी दुर्गे आदी उपस्थित होते.

पोलीस विभागाच्या डॉल्बीमुक्तीकडून जलयुक्तकडे या उपक्रमाची माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांक मिरज तालुक्यातील आहेत. मिरज तालुक्यात या उपक्रमांतर्गत चार लाख रुपये निधी जमा झाला आहे. या निधीतून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे सुखकर्ता बंधारा बांधण्यात आला आहे. या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात येत असून, नागरिकांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी डॉल्बीला फाटा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, महिलांसाठी 1091 हा टोल फ्री क्रमांक निर्भया पथकाचा आहे. अडचणीच्या वेळी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

अलका खोत यांनी महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. तर डॉ. स्वप्नील चोपडे यांनी अवयवदानाचे महत्त्व विषद केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमानंतर श्री छत्रपती शिवाजी चौक, गणेशोत्सव मंडळ मिरज येथही संवादपर्व उपक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या घडीपत्रिका उपस्थित मान्यवरांना मोफत भेट देण्यात आल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result