महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वृक्ष लागवड कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी नियोजन करावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवार, ३१ मे, २०१९


नाशिक :
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो वाढविण्यासाठी वन विभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे १६ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेश अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ.राम बाबु यांच्यासह अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन संरक्षक उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी वन विभागामार्फत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वनविभागामार्फत पर्यावरण संवर्धनाच्या व संरक्षणाच्या विविध योजना राबविल्या जातात, त्यांची वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार प्रसिद्धीचा वापर करण्यात यावा. त्या अनुषंगाने वनविभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रसिद्धी करण्यात यावी. ज्यामुळे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.

पर्यावरण संवर्धनांतर्गत पशुपक्षांचे संरक्षण करणे व रक्षण करणे देखील आवश्यक आहे. यासाठी देखील अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या धर्तीवर वनयुक्त शिवार अशा नाविण्यपूर्ण कल्पना राबविण्यात याव्यात. ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल करणे आवश्यक असल्याने वनविभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ग्रीन आर्मीच्या सदस्यांमार्फत जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीअंतर्गत वनविभागाच्या राज्यातील ११ विभाग प्रमुखांनी तयार केलेला विभागनिहाय ३३ कोटी वृक्षलागवडीच्या नियोजनाच्या कामाचा अहवाल सादरीकरणामार्फत सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री महोदयांच्या हस्ते वनविभागाच्या विविध पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यासोबत महाराष्ट्र फॉरेस्ट जीओ पोर्टल या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result