महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात मोहीम सुरु मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७
  • आगामी पदवीधर मतदार निवडणुकीसाठी देखील नोंदणी
  • नवमतदार संख्या वाढण्यात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
ठाणे : वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींना ३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या मोहिमेत मतदारयादीत नाव नोंदणी करता येणार आहे. रविवार ८ आणि २२ ऑक्टोबर रोजी देखील यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. यासोबतच कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी पूर्वीची मतदार यादी रद्दबातल करून नवी यादी तयार करण्याचे काम सुरु होत असून २८ सप्टेंबरपासून ही मोहीम देखील सुरु होत आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात तसेच महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती कार्यालयांमध्ये देखील अर्ज स्वीकारले जातील. तसेच सदर पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत 08 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर या रविवारच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव नोंदणी करणेसाठी नमुना अर्ज (6), अनिवासी भारतीयांसाठी मतदार नोंदणी करणेसाठी नमूना अर्ज (6अ), दुबार नोंद असलेल्या, मृत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणेकरिता नमूना अर्ज (7), मतदार यादीतील मतदारांचे नाव, पत्ता, जन्म दिनांक व इतर तपशिल दुरूस्तीकरिता नमूना अर्ज (8) , मतदारसंघातील एका यादीभागातून दुसऱ्या यादीभागातील पत्त्याच्या बदलाकरिता नमूना अर्ज (8अ) असे दावे व हरकती अर्ज स्वीकारले याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. नवीन मतदारांना स्मार्ट कार्ड्स देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पूर्वी दुसऱ्या ठिकाणी मतदार यादीत असलेले नाव रद्द करण्यासाठी ७ नंबर फॉर्म भरावा लागायचा पण सध्या इआरओ-नेट यंत्रणेच्या माध्यमातून त्या मतदारसंघातील नोंदणी अधिकाऱ्यास संबंधित मतदाराची माहिती संगणक यंत्रणेच्या माध्यमातून पाठविण्यात येते आणि त्यानंतर त्या यादीतील नाव आपोआप रद्द होते असेही फरोग मुकादम यांनी सांगितले.

८६ हजार ६७६ नवे मतदार
गेल्या वर्षी नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी घेतलेल्या मोहिमेत ८६ हजार ६७६ नवे मतदार वाढले असून त्यामुळे मतदार यादी ५६ लाख ८६ हजार ६७६ एवढी झाली आहे. पुण्यानंतर ठाण्याचाच नाव मतदार वाढण्यात दुसरा क्रमांक आहे.

पदवीधर मतदार संघासाठी २८ सप्टेंबरपासून नोंदणी
पुढील वर्षी होणार्या कोकण पदवीधर मतदार संघासाठी पूर्वीची यादी न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रद्दबातल झाली असून २८ सप्टेंबर पासून नोंदणी सुरु होत आहे. ६ नोव्हेंबर पर्यंतही नोंदणी सुरु राहिल. तसेच १९ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन त्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देखील मतदार नोंदणी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मतदारांसाठी https://ceo.maharashtra.gov.in आणि http://thaneelection.com या संकेतस्थळांवर आवश्यक माहिती देण्यात आली आहे ती पाहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेस तहसीलदार निवडणूक सर्जेराव म्हस्के पाटील देखील उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result