महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाचनाकडे मन वळवून ज्ञानाने समृद्ध व्हावे- जि. प. अध्यक्षा गोल्हार शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७
बीड : सध्याच्या वैज्ञानिक युगात मुलांमध्ये व्हॉटस अॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी ग्रंथ हेच गुरु आहेत. यामुळे प्रत्येकाने आपले मन वाचनाकडे वळवून ज्ञानाने समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीडच्या वतीने ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, शिक्षण विभागाचे बापूसाहेब हजारे, अनंतराव चाटे, म. दा. शहाणे मंठेकर, संदिप नेकडे, प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि.ना.काळे आदी उपस्थित होते.

श्रीमती गोल्हार म्हणाल्या की, भारताच्या ग्रंथसंपदेमुळेच भारतीय संस्कृतीची संपूर्ण जगाला ओळख झाली असून आपली संस्कृती ही जगभर पोहोचली आहे. माणसाची वैचारिकता वाढविण्यासाठी शालेय जीवनात वाचन खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची कास धरुन आपले ध्येय प्राप्त करावे. बीडकरांना ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून एक चांगली दोन दिवसीय संधी मिळाली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

श्री. गाडेकर म्हणाले की, जिल्ह्यातील वाचनालयात विविध पुस्तकांची व ग्रंथाची खरेदी ग्रंथोत्सवातून करावी. तसेच वाचनालयात जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचे साहित्य ठेवले पाहिजे यासाठी वेगळे दालन निर्माण करुन त्यांना वेगळे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील साहित्यिकांचे ग्रंथ आपल्या वाचनालयात ठेवल्यास आपल्या जिल्ह्याचा लौकिक वाढण्यास मदत होईल.

श्री.काळे यांनी ग्रंथोत्सवाबाबतची माहिती विषद करुन वाचक, साहित्य प्रेमींना एकाच ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तके, साहित्य उपलब्ध व्हावे व वाचन संस्कृती वाढावी या ग्रंथोत्सवामागचा हेतू आहे असे, त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

ग्रंथोत्साव 2017 ची सुरुवात ही ग्रंथदिडीने करण्यात आली. यामध्ये शालेय भजनी मंडळ, वाचक, विविध विभागाचे अधिकारी आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result