महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानामध्ये पलटी नांगराचा समावेश करणार - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गुरुवार, ०७ जून, २०१८
कोल्हापूर कृषी विभागातील कार्यशाळा उत्साहात संपन्न

सांगली :
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर आदी यंत्रसामग्री दिली जाते. मात्र शेतकऱ्यांचा मित्र असणारा नांगराचा समावेश या योजनेत नव्हता. यापुढे पलटी नांगराचा या योजनेत प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली.

वाळवा तालुक्यातील येलूर येथे कोल्हापूर विभागांतर्गत उन्नत शेती समृद्ध शेतकरी विभागस्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कोल्हापूर कृषी विभागातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कृषि अधिकारी, पर्यवेक्षक, सहायक आणि कर्मचारी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने 23 मे पासून सुरू असलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवड्याची सांगता करण्यात आली.

यावेळी कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सुनील बोरकर, सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, कृषी महाविद्यालय विभागप्रमुख डॉ.अशोक पिसाळ, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ.पांडुरंग मोहिते, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे केंद्रप्रमुख डॉ.जयवंत जगताप, सागर खोत, मिरज उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, जत उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.के.बी. खोत, सांगली प्रकल्प संचालक, आत्मा सुरेश मगदूम आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कृषी विभाग विस्ताराने सर्वात मोठा विभाग असून, अधिकारी व कर्मचारी या विभागाचे कणा आहेत. शासन आणि शेतकरी यामधील दुवा कृषी सहायक असल्याचे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन हे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. जलयुक्त शिवार योजनेतून 12 हजारपेक्षा अधिक गावे दुष्काळमुक्त झाली, यामध्ये कृषी विभागाचे योगदान मोठे आहे. यापुढेही या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याचा मित्र म्हणून काम करावे. या खरीप हंगामात शिपाई ते मंत्री सर्वांनी सेल्फी वुईथ फार्मर ही संकल्पना राबवत, शेतकऱ्याच्या बांधावर, प्रत्यक्षात शेतावर जाऊन मदत करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

पिकावर पडणाऱ्या किडीबाबत कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी गाव, मंडल विभागनिहाय कार्यशाळा घ्याव्यात, अशी सूचना करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध असून, कृषी विभागाच्या योजना राबवताना येणाऱ्या अडचणी तसेच सूचना असल्यास आपणास संपर्क साधावा, योग्य सूचनांचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, द्राक्ष पीकविमा योजना वर्षभर राबविण्याबाबत विचार करू. तसेच, शेतकऱ्यांनी तयार केलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच रब्बी आणि खरीप हंगामात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना अन्य कृषीतर कामे लावू नयेत, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक सुनिल बोरकर यांनी केले. आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले.

यावेळी कृषि कार्यालय सातारा यांच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व बीजांकुरण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषि विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक संघटनेच्या वतीने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result