महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भिलारसारखे पुस्तकाचे गाव नवी मुंबई परिसरात व्हावे – आमदार मंदा म्हात्रे बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७
  • वाशी येथे ग्रंथोत्सवास उत्साहाने सुरुवात
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रंथोत्सवास आज वाशी येथे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीने उत्साहात सुरुवात झाली. सेक्टर सहामधील माणिकराव कीर्तने वाचनालय, साहित्य मंदिर सभागृह, येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसांचा ग्रंथोत्सव आयोजित केला असून आज महापौर जयवंत सुतार आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित नागरिक राहत असून याठिकाणी भिलार गावासारखे पुस्तकाचे छोटेसे गाव उभारण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली.

आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान साहित्य मंदिर सभागृहा येथून ग्रंथ दिंडी निघाली. दिंडीतील मुलांच्या हातात ग्रंथांविषयीचे विविध फलक होते तसेच बँड पथकामुळे वातावरण निर्मिती झाली होती. शिवाजी चौकात ही दिंडी विसर्जित झाली. यात मॉडर्न स्कूल, आयसीएल कॉलेज, न्यू बॉम्बे हायस्कूल, ज्ञानविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहभाग घेतला होता.

यानंतर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की, नवी मुंबई परिसरातील २२ ग्रंथालयांच्या माध्यमातून ६० हजार पुस्तके उपलब्ध असून अतिशय चांगला प्रतिसाद आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील मुलांना याचा फायदा होतो, असे ते म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयातील दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सुरु असल्याबाबत माहिती दिली. कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले तसेच माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी केले तर शेखर पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन दिलीप जांभळे यांनी केले.

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रशासन सेवा- जनसेवेची उत्तम संधी या विषयावर पोलीस उपयुक्त संदीप भाजीभाकरे तसेच माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे हे विचार मांडतील. यानंतर मराठवाडा विनोदी एक्स्प्रेसचे डॉ. विष्णू सुरासे यांचा हास्यरंग कार्यक्रम होईल. सायंकाळी या ग्रंथोत्सवाचा समारोप चांगदेव काळे, अरुण म्हात्रे आणि माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होईल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result