महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदिवासींना वनपट्ट्यांबरोबरच उत्पन्नाचे साधनही मिळवून देणार - विष्णू सवरा शनिवार, ०९ मार्च, २०१९पालघर
:
जिल्ह्यातील आदिवासींना वनपट्ट्यांचे वाटप होत आहे हा ऐतिहासिक दिवस आहे. या वनपट्ट्यांचे केवळ वाटप करून शासन थांबणार नाही तर त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत जमिनीचे सपाटीकरण, कुंपण, विहीर, ऑईल इंजिन, पाईपलाईन आदी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 (नियम 2008)(सुधारित नियम 2012) अंतर्गत पालघर जिल्ह्यातील मंजूर वनपट्ट्यांचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते डहाणू येथील कार्यक्रमात वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, आमदार सर्वश्री पास्कल धनारे, विलास तरे, वनहक्क आढावा समितीचे प्रमुख विवेक पंडित, माजी खासदार बळीराम जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, डहाणूचे उप वनसंरक्षक श्री.भिसे, जव्हारचे उप वनसंरक्षक श्री.मिश्रा, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले, वन हक्कांबाबतचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच राज्याच्या एक तृतीयांश इतक्या मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्याने वनपट्टे मंजुरीचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र लाभार्थ्यांना कमीत कमी एक एकर जमीन मिळालीच पाहिजे ही भूमिका घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी रात्रंदिवस हिरीरीने काम करून आपली भूमिका चोखपणे पार पडल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना माजी खासदार श्री.जाधव यांनी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना विश्वासात घेऊन आदिवासींना न्याय दिल्याची भावना व्यक्त केली. तर श्री.तरे यांनी राज्यातील सर्वात मोठे काम पालघर जिल्ह्याने केल्याबद्दल अभिनंदन करून प्रलंबित दावे लवकर निकाली काढावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री.धनारे यांनी आदिवासी समाजाची मोठी मागणी आज पूर्ण होत असल्याबाबत समाधान व्यक्त करून आदिवासी कसत असेल तेवढी जागा त्याच्या नावावर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री.पंडित यांनी पालघर जिल्ह्यात राज्याच्या एक तृतीयांश प्रमाणात वनपट्टे वाटप होणे हे वन हक्क कायदा आणि त्याची योग्य अंमलबजावणी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे शक्य झाल्याचे सांगितले. प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी काम करता येणे हे माझे सौभाग्य असल्याचे सांगितले. वनपट्टे वाटपाबरोबरच कातकरी अभियानांतर्गत 573 कातकरींना जागा देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हक्काकडून सक्षमतेकडे हे ब्रीद नजरेसमोर ठेवून वनपट्टे धारकांना काही वर्षांत उत्पन्नाचे साधन निर्माण होईल अशा फळबाग लागवडीच्या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जमीन मिळवून देणे हे ध्येय बाळगून यापेक्षाही अधिक चांगले काम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ.किरण महाजन यांनी वनपट्टे मंजुरीच्या कामाची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 44,384 वैयक्तिक दावे मंजूर करण्यात आले असून त्यांचे क्षेत्र 55,957 एकर इतके आहे. तर 441 सामूहिक दाव्यांना 70,653 एकर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यात वनमित्र मोहीम राबवून 14598 दावे हाताळण्यात आले ज्यापैकी 9357 दावे मंजूर करण्यात आले आहेत. आता विभागीय पातळीवर केवळ 2934 दावे शिल्लक असून एकूण मंजूर दाव्यांपैकी 8838 दावे जिल्हा पातळीवर अपिलात प्रलंबित आहेत. ते देखील लवकरात लवकर निकाली काढले जातील, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांच्यासह वनपट्टे मंजुरी प्रकरणी उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

डहाणू येथील अशोक राजपूत यांनी त्यांच्या कन्येच्या नुकत्याच झालेल्या विवाहामध्ये आहेर स्वरूपात आलेल्या एक लाख 73 हजार रुपये रकमेचा धनादेश पुलवामातील शहीदांच्या कुटुंबियांसाठी यावेळी पालकमंत्र्यांकडे सुपूर्त केला.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार रेवणनाथ लबडे यांनी केले, तर डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग यांनी आभार मानले. कार्यक्रमास आदिवासी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result