महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना; ठाण्यात ऑनलाईन शुभारंभ मंगळवार, २५ जुलै, २०१७
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मोफत सुविधा
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून या प्रक्रियेमुळे ठाणे जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहचण्यास मदत होईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर ऑनलाईन अर्ज व घोषणापत्र भरण्याची सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी व प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर जाऊन आपले ऑनलाईन अर्ज ३१ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत सादर करावेत.

या घोषणापत्राचा नमुना सर्व सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. यानुसार आवश्यक माहिती, आधारकार्ड, बँक पासबुकसह शेतकऱ्यांनी नजीकच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन कर्जमाफीसाठी आपला अर्ज सादर करावा. https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://www.csmssy.in या वेबपोर्टलवरून शेतकरी स्वतः आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

बँकांनी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात मदत करावी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पूर्व तयारीचा आढावा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तसेच यावेळी उपस्थित सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना त्यांनी कर्जमाफीच्या या महत्त्वपूर्ण योजनेत शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक श्री पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजन जोशी यांच्यासह महा ई-सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक व सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

बँकांनी शेतकऱ्यांना खरीपासाठी १० हजार रुपये मदत उपलब्ध करून द्यावी
३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी १० हजार रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी निविष्टा खरेदीसाठी १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी दिल्या. तसेच कर्जमाफी, तातडीचे कर्ज व प्रधानमंत्री पीक विमा योजना यासह इतर कोणत्याही योजनेसाठी शेतकरी बँकेमध्ये आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result