महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण : विद्यार्थ्यांनी शासन उपक्रमात सहभागी व्हावे - शिवाजी कादबाने शुक्रवार, १७ मार्च, २०१७
नवी मुंबई : तरुण पिढीसमोर शासनाचे उपक्रम पोहोचतात आणि ही पिढी नव्या संकल्पना देखील मांडते, हा सकारात्मक बदल घडतो आहे. त्यांनी शासनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन कोकण विभागीय उपायुक्त शिवाजी कादबाने यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभागामार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

शिवाजी कादबाने म्हणाले की, शासन कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम राबवित आहे. विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. रोजगार व कौशल्य विकासासंबंधी विविध सेवा देण्यासाठी महाकौशल्य पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी महाविद्यालयीन स्तरापासून प्रयत्न केले पाहिजेत. विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामध्ये प्राविण्य मिळविले पाहिजे.

डॉ.गणेश मुळे उपसंचालक (माहिती) यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्य शासनाच्या दोन वर्षेपूर्तीनिमित्त कोकण विभागस्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित या खुल्या निबंध स्पर्धेसाठी कोकण विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पुरस्कार प्राप्त निबंधाची पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. शासन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विविध उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन काळात स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. युवकांना रोजगार व प्रशिक्षणासाठी राज्यात शासनाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजगता विकास अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.

निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण

या कार्यक्रमात निबंध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा उपायुक्त कादबाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र, धनादेश व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक अभय विजय खंडागळे (शेठ ज.नौ.पालीवाला वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान आणि कला महाविद्यालय पाली-सुधागड जि.रायगड), द्वितीय क्रमांक मुस्कान मुबारक सलाती (स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज चेंबूर), तृतीय क्रमांक कोमल रवींद्र पाटील (राजाभाऊ मोने उच्च माध्यमिक विद्यालय, गोरेगांव,रायगड) यांना घोषित करण्यात आले आहे, उत्तेजनार्थ पारितोषिक आर्पिता अविनाश मोरे (सोनोपंत दांडेकर कला वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय पालघर), पूनम सुरज पाटील (ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग-रायगड), जागृती चिंतामण लिहे (सोनुभाऊ बसवंत कॉलेज शहापूर जि.ठाणे), अभिषेक अशोक हाडवळे (पेस ज्युनिअर सायन्स कॉलेज नेरुळ नवी मुंबई), विणा विलास पेटारे (लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोंढी-किहीम ता.अलिबाग जि.रायगड) यांना प्राप्त झाले आहेत व विशेष सहभाग प्रमाणपत्र वरेण्य श्रीनिवास जोशी श्रीमान विनायक (सदाशिवशेठ गांगण (मालगुंड) कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी), अक्षय दत्ता मेरे (सोनोपंत दांडेकर कला वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय पालघर), भुपेंद्र विकास विचारे (लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोंढी-किहीम ता.अलिबाग जि.रायगड), साक्षी योगेश पंडीत (अभ्यंकर –कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी), वैदेही पाटील (सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, अंधेरी मुंबई) यांना प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक व विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माहिती सहायक शैलजा पाटील यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result