महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील टंचाई निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात - पालक सचिव विनिता सिंघल शनिवार, १८ मे, २०१९


परभणी
: टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकसचिव तथा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणीटंचाईसह दुष्काळ निवारण, जलसंधारण कामांचा आढावा त्यांनी एका बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे व जिल्हास्तरीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

परभणी जिल्ह्यात उद्भवलेली पाणीटंचाई आणि त्यावर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्रीमती सिंघल यांनी यावेळी घेतला. टंचाई निवारणासाठी सुरु असलेले टँकर, विहीर अधिग्रहण, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी कामांची माहिती श्रीमती सिंघल यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी व त्याचप्रमाणे ज्या गावात टंचाई आहे तेथे आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, आवश्यक तेथे दिर्घकालीन उपाय प्रस्तावित करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावरील टंचाईचा आढावा घेतानाच, जलसंधारण व रोजगार हमी योजनेची कामे, त्यावर मजुरांची उपस्थितीचीही माहिती त्यांनी घेतली. पाणीटंचाई निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result