महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील एक लाख 13 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 478 कोटी रुपये वितरीत- पालकमंत्री पंकजा मुंडे शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८
बीड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एक लाख 40 हजार 36 पात्र शेतकऱ्यांसाठी 545 कोटी 29 लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातील एक लाख 13 हजार 664 शेतकऱ्यांना 478 कोटी 56 लाख रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आलेला आहे. या कर्जमाफीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समांरभ बीड येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी धनराज निला, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार आदिनाथ नवले यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, बीड शहराची वाढती लोकसंख्या व रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेल्या एम.सी.एच. विंग 100 खाटा व अतिरिक्त 200 खाटा अशा एकूण 300 खाटांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा व रुग्णालय पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच स्वामी रामानंदतीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 230 खाटांची सर्जिकल इमारत, नर्सिंग होम, धर्मशाळा व नवीन टी.बी. वार्डाचे लोकार्पण करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असून 898 वरुन 927 इतके झाले आहे. आणखी वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या धर्तीवर मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य या मध्ये सुधारणा करणे, उज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलगी वारसदार ही भूमिका समाजामध्ये रुजविणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.

अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजारवरुन 6 हजार 500 तर मदतनीसांचे मानधन 2 हजार 500 वरुन 3 हजार 500 रुपये मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 3 हजार 250 रुपयांवरुन 4 हजार 500 रुपये करण्यात आले. तसेच भाऊबीज दुप्पट करण्यात आली आहे. मार्च 2018 पासून या मानधनात 5 टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार या अभियानाची बीड जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यातील एकूण 722 गावातील 10 हजार 395 कामांवर 268 कोटीचा निधी खर्च झालेला आहे.

त्यातून 1 लाख 2 हजार 776 टीसीएम पाणीसाठी निर्माण होऊन 51 हजार 388 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षित सिंचनाची उपलब्धता झालेली आहे. तर सन 2017-18 मध्ये 195 गावातील 2 हजार 901 कामांसाठी 130 कोटी 70 लाखाचा आराखडा मंजूर होऊन त्यातील 560 कामांपैकी 542 कामे पूर्ण झालेली आहेत. असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

अहमदनगर-परळी-बीड रेल्वे मार्गाचे 1290.29 हे. आर. क्षेत्राचे भुसंपादन पूर्ण झाले आहे. अहमदनगर ते नारायणडोह 13 कि.मी. पर्यंत रेल्वेने इंजिन चालवून चाचणी घेतली आहे. 2019 पर्यंत रेल्वे सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे सांगून जिल्ह्यात एकूण 8 राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत. अशी माहिती श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिली.

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून याअंतर्गत जिल्ह्याच्या सर्व गावांमधील रस्ते चांगले करण्यात येत असून सुमारे 450 गावे मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले आणि जिल्ह्यात ग्रामीण निवारा योजनेंतर्गत सन 2016-17 मध्ये एकूण 7 हजार 780 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. राज्यातील बेरोजगारांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविण्यात येत असल्याची माहिती श्रीमती मुंडे यांनी दिली.

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या आणि श्रीक्षेत्र नारायण गडास नुकतेच बहुउद्देशीय सभागृहासह तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता प्रत्येकी 25 कोटी इतक्या रकमेच्या विविध कामांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीने मंजूरी दिली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेत बीड जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम होत असून 6500 उद्दिष्टांपैकी 6901 लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यापैकी 3190 कामे सुरु झाली असून 2964 कामे पूर्ण झाली आहे. पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी 1668 कामाचे जीओ टॅगीग करण्यात आलेली असून या कामामध्ये मराठवाड्यातून जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. वृक्ष लागवडीचे गतवर्षीचे 17 लाखाचे उद्दिष्ट आपण यशस्वीरित्या पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017-18 मध्ये बीड जिल्हा प्रथम स्थानी आहे. राज्यात एकट्या बीड जिल्ह्याचा 14.53 टक्के वाटा आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामात 2017-18 अंर्तगत बीड जिल्ह्याचा 43.16 टक्के वाटा असून यातही जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे बीड जिल्हा प्रथम स्थानी आहे. तसेच जिल्ह्यात 63 महसूल मंडळामध्ये स्वंयचलित हवामान केंद्राना मंजूरी दिली असून सर्व 63 ठिकाणी कामे पूर्ण करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये बीड विभागात 3 लाख 51 हजार 362 शौचालय असलेले कुंटुंब सद्य:स्थितीत आहे. दिलेल्या उद्दिष्टांच्या 100 टक्के काम यामध्ये झालेले आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील 1015 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याची माहिती श्रीमती मुंडे यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांची व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस दलाच्या प्लाटूनसह विविध विभाग, शाळा आणि महाविद्यालयांचे परेड संचलन झाले. यामध्ये जिल्हा पोलीस दल, आर.सी.पी, महिला पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी विद्यालय, स्काऊट-गाईड, पोलीस बँड, आदि पथकांचा समावेश होता. तसेच महिला गस्त पथक, अग्नीशमन पथक, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन व जिल्हा रुग्णालय, निवडणूक विभाग यांच्यासह विविध विभागाच्या चित्ररथाचे संचलन झाले. विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.संगीता धसे, अनिल शेळके आणि अभिमन्यु औताडे यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व पदाधिकारी, शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result