महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विविध विकासकामांसह अनेक महत्त्वाच्या नाविन्यपूर्ण योजना राबविणार - पालकमंत्री शुक्रवार, ३१ मे, २०१९

 
  • जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ४४४ कोटी ६५ लाख निधीची तरतूद

  • नाविन्यपूर्ण योजनेत जलपुनर्भरणासाठी शोषखड्डे

  • महिला बचत गट व गट शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी मॉल

अमरावती :
जिल्ह्यात विविध क्षेत्रातील विकासकामांसह जलपुनर्भरणासाठी शोषखड्डे, महिला बचत गट व गटशेती सदस्य शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी मॉल आणि जैवविविधतेने समृद्ध अटल आनंदवन अशी नाविन्यपूर्ण कामे राबविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केली. समितीच्या सभेत गतवर्षीच्या ४५० कोटी ९८ लाखांच्या खर्चाला मान्यता देत २०१९-२० या वर्षासाठी ४४४ कोटी ६५ लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रमेश बुंदिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, समितीचे सदस्य रवींद्र कोल्हे यांच्यासह सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, सदस्य उपस्थित होते.

सन २०१८-१९ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) २१२.०३ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ९२.०९ कोटी तर आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र यात १४६.८५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. सन २०१९-२० साठी जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) २४९ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ९८.९२ कोटी तर आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र यात ९६.७३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. ही एकूण तरतूद ४४४.६५ कोटी आहे.

पालकमंत्री श्री. पोटे पाटील यावेळी म्हणाले की, जलपुनर्भरण व शोषखड्डा यासाठी स्वतंत्र योजना जिल्ह्यात राबविण्यात येईल. महिला बचत गटांच्या तसेच गटशेती सदस्यांच्या वस्तू, उत्पादन विक्रीसाठी दालन सुरू करण्यात येईल. अटल आनंदवन अंतर्गत एका एकरात सुमारे साडेबारा हजार झाडी असलेले वन शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण करण्यात येईल. सायन्सस्कोअर मैदानाच्या सुरक्षिततेसाठी कुंपण, सौंदर्यीकरण करण्यात येईल. झाडे लावल्यावर संगोपनासाठी ट्री गार्ड आदीसाठी ग्रामपंचायतीना आनंदवन उपक्रमातून निधी देण्याचा प्रस्ताव यावेळी मान्य झाला. सायन्सस्कोअर मैदानालगतच्या परिसरात सायन्स पार्क उभारण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला.

रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत लोकप्रतिनिधीच्या सूचना प्राप्त करून घेऊन कामांत समावेश व्हावा. ज्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना काय कामे सुरू आहेत, याची माहिती दिली नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. खरीप लक्षात घेता तत्काळ पिककर्जाचे मेळावे लावावे. क्रीडा अनुदानातून व्यायाम शाळा विकासाचा निधीतून खासगी संस्थांना निधी देण्यात आला, त्याची सविस्तर माहिती सादर करावी. दलित वस्त्यांमध्ये सुविधा योजनेत कामे राबविताना लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. प्रत्येक बाबीवर विभागनिहाय होणार खर्च त्रयस्थ पक्षाकडून किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून तपासून घ्यावे. वडाळी परिसरातील दोन तलावातील गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी दोन कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ते काम पूर्णत्वास जाईल, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.



पशुसंवर्धन योजनेत ठराविक लोकांनाच लाभ मिळत असल्याची तक्रार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी. निवडलेल्या लाभार्थींची माहिती समितीला मिळाली पाहिजे अनुसूचित जाती विहिरी विद्युतीकरण योजनेत एकाच विहिरीचे विद्युतीकरण झाले, ही बाब गंभीर आहे. ही कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे डॉ. देशमुख म्हणाले.

सायन्सकोर मैदानावर ऐतिहासिक ठेवा आहे. त्याचे जतन व सौंदर्यीकरणासाठी एक कोटी वीस लक्ष मान्य होण्याची मागणी आ. डॉ. देशमुख व आ. जगताप यांनी केली. त्याला पालकमंत्री यांच्यासह सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या कामाला निधी कमी पडू देणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले.

कुठल्याही कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करताना बचत गटांकडून तयार केलेल्या बास्केटचा वापर व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. सर्व सदस्यांनी बाके वाजवून या सूचनेचे स्वागत केले.

सर्वसाधारण योजनेत २०१८-१९ या वर्षात जिल्हा परिषदेला ७७.७५ कोटी, नगरपालिकांना १८.६४ कोटी, महापालिकेला ११.७० कोटी तर राज्यस्तर यंत्रणेला १०४.७७ कोटी निधी वितरीत करण्यात आला. चालू वर्षात जिल्हा परिषदेला ८६.१५ कोटी, नगरपरिषदेला १८.६१ कोटी, महापालिकेला ६.७५ कोटी व राज्यस्तर यंत्रणांना १३७.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result