महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहीद प्रेमदास मेंढे अनंतात विलीन रविवार, १२ मार्च, २०१७
  • शोकाकुल वातावरणात भावपूर्ण निरोप
  • बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिली मानवंदना

वर्धा :
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील भेज्जी येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद सीआरपीएफ जवान प्रेमदास मेंढे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

पुलगाव येथील सैनिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने शहीद जवानाला अखेरचा निरोप दिला. यावेळी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अंतिम मानवंदना दिली. यावेळी खासदार रामदास तडस, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी जी. एच. भुगावकर यांनी पुष्पचक्र अर्पित करून श्रध्दांजली दिली.

शनिवारी केंद्रीय राखीव दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 12 जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 3 जवानांचा समावेश आहे. शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते. आज रायपूर येथून शहीद तीन जवानांचे पार्थिव सकाळी 7.40 वाजता चॉपर हेलिकॉटरने भंडारा येथे तर उर्वरित दोन नागपूर येथे आणण्यात आले. नागपूरहून प्रेमदास मेंढे यांचे पार्थिव मोटारीने नाचणगाव येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. येथे घरी पोलिसांनी सलामी दिली. यावेळी त्याच्या घरी मोठा जनसमुदाय जमला होता.

मूळचे सोनोरा ढोक येथील रहिवासी असलेले 38 वर्षाचे प्रेमदास अतिशय मनमिळावू आणि हसतमुख स्वभावाचे म्हणून परिचित होते. अत्यंत गरीब परिस्थितीतुन प्रेमदास मेंढे पुढे आले होते. तीन भावांपैकी ते सर्वात धाकटे. सुमारे 15 वर्षापासून केंद्रिय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, श्रीनगर, पुणे, तळेगाव येथे सेवा बजावली. दोन वर्षांपूर्वीच त्यांची छत्तीसगढ येथे बदली झाली होती. मागील महिन्यातच ते कुटुंबियांच्या भेटीसाठी घरी आले होते. 19 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा देशसेवेच्या कार्यात रुजू झाले. आज झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा आर्यन (11), मुलगी गुंजन(9) व दोन भाऊ तसेच मोठा आप्त परिवार आहे.

राज्य शासनाकडून 10 लाखाची मदत
नक्षली हल्यात शहीद झालेले प्रेमदास मेंढे यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 10 लाखाची मदत जाहीर केली आहे. लवकरच सन्मानाने त्यांच्या कुयुंबियाना ती दिली जाईल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result