महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजना निधीचा आढावा शनिवार, ०१ जुलै, २०१७
बीड : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चालु आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 315 कोटी 36 लक्ष 13 हजार रुपयांचा नियतव्य मंजूर असून त्याच्या खर्चाचा तसेच मागील वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्च 2017 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस सर्वश्री आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, आर.टी. देशमुख, लक्ष्मण पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन 2017-2018 या वर्षाच्या 315 कोटी 36 लक्ष 13 हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यात सर्वसाधारण योजनेसाठी 223 कोटी 70 लक्ष, अनु सूचित जाती उपयोजनेसाठी 89 कोटी 60 लक्ष आणि आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी 2 कोटी 6 लक्ष 13 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी व सलंग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे, पूर नियंत्रण, सामाजिक व सामुहिक सेवा या गाभा क्षेत्रासाठी आणि ऊर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा व सामान्य सेवा या बिगरगाभा क्षेत्रासाठी विभागांच्या मागणीनुसार निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती मुंडे यांनी मागील वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्च 2017 अखेर झालेल्या खर्चाचा सर्व यंत्राणांच्या अधिकाऱ्याकडून सविस्तर आढावा घेतला. मागील नियोजन समितीच्या बैठकीतील उपस्थित मुद्याचे सर्व संबंधित यंत्रणेकडून अनुपालन व यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली. सन 2016-17 मधील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मंजूर नियतव्यय 267 कोटी 54 लक्ष होता. त्यापैकी 267 कोटी 42 लक्ष 54 हजार खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजना मंजूर नियतव्यय 79 कोटी 65 लक्ष होता त्यापैकी 69कोटी 26 लक्ष 40 हजार खर्च झाला आहे. तर आदिवासी उपयोजना मंजूर नियतव्यय 1 कोटी 95लक्ष 73 हजार होता त्यापैकी 1 कोटी 95लक्ष 73 हजार खर्च झाला आहे.

सन 2017-18 करिता नाविन्यपूर्ण योजनेसाठी 7 कोटी 82 लक्ष 95 हजार रुपयाचा निधी मंजूर असून 2 कोटी 26 लक्ष 37 हजार रुपयाचे दायित्व आहे. दायित्व वजा जाता 5 कोटी 56 लक्ष 58 हजार रुपयाचा निधी नवीन कामासाठी उपलब्ध आहे. सन 2016-17 मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 8 पर्यटनस्थळांना रुपये 2 कोटी 77 लाख 13 हजार निधी प्राप्त झाला असून हा निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामीण भागातील विज व्यवस्थेमधील दोषांकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. अखंडीत वीज पुरवठ्यासाठी नवीन डीपीच्या गरजा पूर्ण करताना ग्रामीण जनतेचे हाल होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्याना देतानाच पालकमंत्री मुंडे यांनी गैरव्यवहाराविषयी तक्रारी आल्यास गय केली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील शाळांच्या नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्तीविषयी चिंता व्यक्त करुन या शाळेचे पुनर्जीवन करण्यासाठी खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करुन या शाळांची नावीन्य योजनेतून दुरुस्ती करण्यात येणार असून जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांचा दुरुस्तीचा आराखडा तयार करावा. दुरुस्तीसाठीच्या प्राधान्यक्रमानुसार वर्गीकरण करावे.

यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ www.beed.nic.in या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात पालकमंत्री पंकजा मुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी जिल्हा वार्षिक योजना विषयी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवाणे आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या योजनांची माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result