महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आषाढी वारी सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे - पालकमंत्री गिरीश बापट सोमवार, ०३ जून, २०१९


पुणे :
पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रध्देचा विषय आहे. हा आनंदी सोहळा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉलमध्ये आषाढी वारी पूर्व तयारीची बैठक श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अमर साबळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत परिचारक, राहुल कुल, आमदार मेधा कुलकर्णी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व विविध विभागाचे अधिकारी , आळंदी संस्थान प्रमुख ॲड विकास ढगे, संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे व विविध पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन आषाढी वारी बाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, यांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.

यावेळी प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट असून तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लावायचे असल्याचे सांगितले. या आषाढी वारीत वृक्ष लागवडीबाबत सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट बोलताना म्हणाले, पालकमंत्री म्हणून ही माझी शेवटची बैठक आहे. मला आपण खासदार म्हणून निवडून दिले, याबद्दल आभार व्यक्त करुन प्रातिनिधीक स्वरुपात उल्हासदादा पवार यांचे त्यांनी स्वागत केले.तसेच सर्वांना पेढे वाटून कृतज्ञता व्यक्त केली.

ते म्हणाले, दरवर्षीप्रमाणे हा सोहळा यावर्षीही उत्साहात साजरा व्हावा. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमाणेच अन्य पालख्यांची सोय चांगल्याप्रमाणे करावी. कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये. पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, चोख ठेवावी. मोबाईल टॉयलेट, पाण्याचे टँकर आवश्यक त्या ठिकाणी पुरविण्यात यावे. पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

आळंदी देहू मार्गावरील दुरुस्तीचे काम तातडीने करुन घ्यावे. पालखी महामार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन घ्यावीत. तसेच पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करुन तात्पुरत्या स्वरुपात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व विजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरीच्या मार्गावर प्लॅस्टिक पत्रावळ्या, प्लॅस्टिक ग्लास, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी लोकांच्यात जनजागृती करावी.

वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उदभव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. पंढरपूर आषाढी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या आषाढी वारीत विद्यापीठांचा सक्रीय सभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result