महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गावांचा विकास व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील - सदाभाऊ खोत रविवार, ३० जुलै, २०१७
सांगली : प्रत्येकाला आपले गाव स्वच्छ, सुंदर व्हावे, गावाचा विकास व्हावा असे वाटले पाहिजे. यासाठी मिळेल त्या निधीमधून गावाचा विकास केला पाहिजे. रस्ते, पाणी व इतर विकास कामाच्या माध्यमातून गावांचा विकास व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, भडकंबे गावच्या सरपंच कांचन डोंबाळे, उपसरपंच संभाजी तळप, सागर खोत, आनंदराव पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, भडकंबे गावासाठी पेयजल योजनेंतर्गत 1 कोटी 74 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची तांत्रिक मान्यता मिळवून येत्या 15 दिवसात या कामाचे टेंडर काढले जाईल. हे काम चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे. या योजनेमध्ये पाण्याच्या फिल्टरचाही समावेश आहे त्यामुळे गावाला शुध्द पिण्याचे पाणी मिळणार आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी रस्ते, गटारी तसेच अन्य सुविधांच्या कामाला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दीड लाख रुपये पर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील 34 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले आहे त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांना 25 हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्यासाठी भविष्यकाळात चांगली योजना आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. बोगस कर्जदारांना रोखण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ऑनलाईन केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना बँकांनी दीड लाख रूपये कर्जाच्या पुढील रक्कमेचे हप्ते पाडून त्याप्रमाणे कर्ज हप्त्याने वसूल करण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

प्रारंभी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते भडकंबे गावातील 3 लाख 99 हजार रूपये किंमतीच्या आरसीसी गटर बांधकाम कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भडकंबे गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या विविध समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. मंत्री महोदयांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपिस्थत होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result