महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासनाच्या योजना, उपक्रम जाणून घेण्यासाठी उर्दू लोकराज्य उपयुक्त, वर्गणीदार व्हा- सोनटक्के शुक्रवार, २८ जुलै, २०१७
बीड : जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील विशेषत: नागरिकांना व त्यांच्या कुटंबांना उर्दू लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची व विविध उपक्रमांची माहिती व्हावी व त्यांना या योजनाचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्यावतीने "उर्दू लोकराज्य" हे मासिक दरमहा प्रसिद्ध करण्यात येत असून हे मासिक सर्व उर्दू भाषिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या समाजातील नागरिकांनी या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी केले.

बीड येथील अलहुदा उर्दू महाविद्यालय येथे उर्दू लोकराज्य मासिकाचे वाचक संख्या वाढविण्यासाठी आयोजित कार्यक्रमात श्री. सोनटक्के बोलत होते. यावेळी अलहुदा उर्दू महाविद्यालयाचे मुख्याद्यापक सिराज खान, जिल्हा माहिती कार्यालयाचे ना. गो. पुठ्ठेवाड, जिल्हा माहिती कार्यालयाचे राजेंद्र वाणी, शेख मोईजोद्दीन, शेख शेख रफीक, शेख मसुद, युनुस खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.सोनटक्के म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" हे मासिक दरमहा प्रसिद्ध करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक माहिती प्रसिद्ध करण्यात येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त व त्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारी माहिती तसेच शासनाने घेतलेले निर्णय, योजना व राज्याच्या कारभाराची माहिती यातून मिळते. मराठी लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये आहे तर उर्दू लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असून वर्गणीदाराला वर्षभर अंक पोस्टाने घरपोच पाठविले जातात. तसेच हे अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व उर्दू भाषिक समाजातील नागरिकांनी उर्दू लोकराज्य मासिकाचे 50 रुपये वर्गणी भरुन मोठ्या प्रमाणावर वर्गणीदार व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात मुख्याद्यापक सिराज खान यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती उपस्थितांना सविस्तर करुन दिली. उर्दू लोकराज्य अल्पसंख्याकासाठी महत्वाचे असून त्यामध्ये शासनाची सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून अल्पसंख्याकाच्या योजनांची तसेच विविध कार्यक्रमाची माहिती यामध्ये देण्यात येत असते. उर्दू लोकराज्य समाजातील सर्वांच्या उपयोगाचे आहे. त्याची वार्षिक वर्गणी 50 रुपये असल्याने खूपच माफक आहे तसेच हे अंक आपणास पोष्टाने घरपोच उपलब्ध होत असल्याने अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी वर्गणीदार होवून शासनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सूत्रसंचालन सय्यद रहेबर यांनी केले तर आभार शेख अब्दुल हकमी यांनी मानले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील विद्यार्थीनी शेख मुस्कान मुसा, मिर्झा अदिबा तौफीक यांच्या स्वागत गीताने करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result