महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागरिकांना दिलासा देण्यासाठी संवेदनशिलतेने कामे करा - रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल शनिवार, ११ मे, २०१९नंदुरबार
:
दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या समस्या तात्काळ दूर कराव्यात आणि अधिकाऱ्यांनी संवेदनशिलतेने कामे करावीत, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे आदी उपस्थित होते.


श्री. रावल म्हणाले, नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विंधन विहिरी आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात यावे. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. येत्या काळात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे पर्यायी नियोजन तयार ठेवावे.


तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या गावपातळीवरील यंत्रणेची बैठक घेऊन टंचाईचा आढावा घ्यावा. रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत बैठकीद्वारे नागरिकांना माहिती देण्यात यावी. सामाजिक वनीकरण व वन विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम रोहयो अंतर्गत घ्यावे. तसेच दुष्काळ स्थितीत शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीदेखील देण्यात यावी.


शहरातील स्वयंसेवी संस्था आणि  विविध संघटनांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात यावे. जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढवावा व आवश्यक त्या ठिकाणी तलावातील गाळ काढण्याची कामे वेगाने करण्यात यावीत. वनविभागाने वनक्षेत्रात असणाऱ्या तलावातील गाळ काढण्यासाठी मंजूरी द्यावी.


बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुष्काळी अनुदानाबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांना पिण्याचे पाणी, धान्य, चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन तयार ठेवावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.


नंदुरबार जिल्ह्यात 12 तात्पुरत्या पाणी योजनांचे काम पर्ण झाले आहे. 23 विंधनविहिरींचे काम पूर्ण झाले असून 61 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 4 विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे. धडगाव तालुक्यात एका टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे, अशी माहिती श्री.गौडा यांनी दिली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result