महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘आपले पोलीस आपली अस्मिता’ लोकराज्यच्या अंकाचे विमोचन बुधवार, १७ जानेवारी, २०१८
बीड : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ या लोकराज्यच्या विशेष अंकाचे विमोचन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे पर्यवेक्षक ना. गो. पुठ्ठेवाड उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जानेवारी 2018 चा लोकराज्य अंक ‘स्मार्ट, समर्थ, संवेदनशील आपले पोलीस आपली अस्मिता’ या विषयावर काढण्यात आला आहे. पोलीस विभागासाठी असलेल्या योजना, सायबर गुन्हे, डिजिटल तपासाच्या स्मार्ट दिशा, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, गुन्हे सिद्धीचे शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापराच्या पद्धती या विषयीची माहिती या अंकाचे वैशिष्ट्य आहे. पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना हा अंक संग्राह्य असाच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या विशेष अंकात सुरक्षित-सुव्यवस्थित महाराष्ट्र, प्रतिसाद आणि प्राधान्य, तंत्रज्ञानाच्या वापराला अग्रक्रम, फोर्सवन : शौर्यातच असते विजयश्री, महामार्गाचे रक्षक-सक्षम-समर्थ सदैव सज्ज, तत्पर तपास आणि अपराध सिद्धीत वाढ, संवेदनशील कर्तव्यदक्षता, अब हम रुकेंगे नही-छोडेंगे नही..., निर्विवाद समर्थ मुंबई पोलीस, बडी कॉप आणि पोलीस काका, शोध आणि मुस्कान, धडक कारवाई आणि प्रतिबंध, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, तुमची सुरक्षा-तुमचे हित, आपत्स्य सर्व सेवा कालम, गुन्हेसिद्धीचे शास्त्रीय तंत्र, डिजिटल तपासाची स्मार्ट दिशा अशी विविध सदर व पोलीस विभागाच्या कर्तबगारीचा आलेख या अंकात आहेत.

त्यासोबतच सायबर युगाची आव्हाने, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय, सायबर गुन्ह्यांचा पाठलाग, सागरी सुरक्षितेची सज्जता, गृहरक्षक : निष्काम सेवा, संधी न्यायाची, प्रेरणादायी ऊर्जा, दीदीचे साहाय्य, संपर्कदूत दक्षता, संधी शिक्षणाची, 24 तास आपल्या सेवेत, वन वैभव आणि निसर्ग पर्यटन, नवी ऊर्जा, देणारी उभारी, सुरक्षित वीज, सुरक्षित जीवन, आर्थिक स्वावलंबन ते यशस्वी उद्योजिका, रोपवाटिका ते ट्री मॉल, किमया आंतरपिकांची आणि येथे कर माझे जुळती अशा विषयाचा आलेख लोकराज्य अंकात मांडण्यात आला आहे. त्यासोबतच उत्कृष्ट छायाचित्रण हे या अंकाची जमेची बाजू आहे. जानेवारीच्या लोकराज्य अंकात राज्यातील पोलीस विभागाच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे. हा अंक पोलीसांना तसेच नागरिकांना अत्यंत वाचनीय तसेच संग्रही ठेवण्यासारखा आहे.

शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुक स्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय ईमारत, तळमजला, बीड येथे वार्षिक वर्गणी भरुन अंक घरपोच पोस्टाद्वारे पाठविण्याची सेवा उपलब्ध असुन शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करुन घ्यावे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result