महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वीर शिदनाक स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार - सामाजिक न्यायमंत्री बडोले मंगळवार, ०७ नोव्हेंबर, २०१७
सांगली : मिरज तालुक्यातील कळंबी येथील वीर शिदनाक स्मारकासाठी शासनातर्फे आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी कळंबी येथील वीर शिदनाक स्मारकास भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा.प्रमोद इनामदार, सर्जेराव वाघमारे, सुभाष इनामदार, सचिन कडलक, मकरंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक न्यायमंत्री श्री.बडोले म्हणाले, शासनाने मुंबईतील इंदु मिलच्या जागेचा व इंग्लंडमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचा प्रश्न सोडविला आहे. शिदनाक महाराज हे बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहेत. वीर शिदनाक स्मारकासाठी आवश्यक असलेल्या निधीची पुर्तता करून बहुजनांची अस्मिता जपण्याचे काम केले जाईल. मिरज तालुक्यातील स्मृतिस्थळांनाही निधी दिला जाईल, असे ते शेवटी म्हणाले. तद्नंतर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मिरज तालुक्यातील आरग येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींची जपणूक करण्यात आलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व अस्थींचे दर्शन घेतले.

वीर शिदनाक स्मारकाबाबत माहिती देताना स्मारक समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार म्हणाले, वीर शिदनाक यांचा 250 वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक वारसा व त्यांच्या युद्धातील वापराच्या शस्त्रांचे जतन केले आहे. १७३९ साली साताऱ्याचे छत्रपती शाहू राजे यांनी वीर शिदनाकांच्या लढवय्या, रणझुंजार कारकिर्दीने प्रभावित होऊन कळंबी हे गाव इनाम दिले व तेव्हांपासूनच या वीर शिदनाकांच्या आत्तापर्यंतच्या त्यांच्या मुळच्या वंशजांना इनामदार याच आडनावने आतादेखील संबोधण्यात येते. अशा शूर वीराचे भव्य स्मारक व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. यासाठी त्यांचे स्मारक उभे करण्याचा संकल्प करण्यात आला. भिमा-कोरेगाव रणस्तंभ सेवा संघ व वीर शिदनाक फाऊंडेशनच्या माध्यमातून या स्मारकाचा नियोजित आराखडा तयार झाला आहे.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी तसेच कळंबी व आरग पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result