महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे मंगळवार, १२ मार्च, २०१९


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक

जालना :
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्च २०१९ रोजी पासून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल २०१९ असणार आहे. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीमध्ये भास्कर आंबेकर, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, तय्यबबापू देशमुख, अनिल मिसाळ, श्री. हिवाळे, सूर्यकांत कलशेट्टी, दीपक रणनवरे, सुरेश कदम आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. बिनवडे म्हणाले, निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे सर्व पक्षांनी पालन करावे. निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय ॲप्लीकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार असून याचा वापर राजकीय पक्षांनी करण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा परवानग्यांसाठी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे सांगत उमेदवारांना ७० लक्ष रूपये खर्चाची मर्यादा आहे. यापेक्षा जास्त खर्च होवून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही. याबाबत काळजी घेण्यात यावी. आचारसंहिता अंमलबजावणीकरिता राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराच्या ताफ्यात आयोगाच्या सुचनेनुसार तीन वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात आत आणण्याची परवानगी असेल. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी उमेदवारांसह एकूण पाच व्यक्ती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात जावू शकतील, अशा सुचनाही जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी केल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने राजकीय पक्षांना सूचना करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result