महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदिवासी वसतिगृहांचे लोकार्पण बुधवार, ०७ फेब्रुवारी, २०१८
‎7 कोटी 52 लक्ष रुपये खर्च
‎375 विद्यार्थी क्षमता
‎50 हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत

वर्धा :
आयुष्यात खूप पैसा, प्रतिष्ठा आणि नाव कमवायचे असेल तर आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. सुख मिळवण्यासाठी कष्ट करण्याची आणि शिकण्याची जिद्द ठेवा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले.

उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतिगृह आणि मुलींचे शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.सवरा बोलत होते. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ.पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मडावी, उमरी मेघेच्या सरपंच संघमित्रा दखणे, प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ आज 50 हजार विद्यार्थी घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा मिळाव्यात आणि चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून सर्व आदिवासी शाळा आणि वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मागील दोन वर्षात राज्यात 206 इमारतींचे काम सुरू केले असून त्यापैकी 81 इमारती पूर्ण झाल्या आहेत. आदिवासी जनतेचा विकास हेच ध्येय ठेऊन शासन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि लवकरच या जिल्ह्यातही असे भवन उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार पंकज भोयर यांच्या मागणीवरून त्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाला कर्मचारी वर्ग देण्याची मागणी मान्य केली.

आमदार पंकज भोयर यांनी वर्धा जिल्ह्यासाठी सहायक आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर केल्याबद्दल श्री.सवरा यांचे आभार मानताना या कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी केली. प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी निवासी सैनिकी शाळा, नवरगाव या गावाप्रमाणेच जंगलातील गरमसुर या आदिवासी गावाचे सुद्धा आदर्श पुनर्वसन करावे ही मागणी केली.

उमरी मेघे येथे 3 वसतिगृहांसाठी 4 एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून बांधकामासाठी 7 कोटी 52 लक्ष रुपये निधी खर्च झाला आहे. आणखी एका इमारतीचे काम सुरू करायचे आहे. उद्घाटन झालेल्या तीनही वसतिगृहाची क्षमता प्रत्येकी 125 विद्यार्थ्यांची आहे. जिल्ह्यात एकूण 12 वसतिगृह असून त्यापैकी 7 वसतिगृह शासकीय इमारतीमध्ये आहेत आणि उर्वरित भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहेत. सर्व वसतिगृहाची क्षमता 1155 विद्यार्थ्यांची असून 1054 विद्यार्थी सध्या प्रवेशित आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण यांनी प्रास्ताविकात दिली.

यावेळी संस्कृती वाकडे या चिमुकलीने गणेश वंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासाठी तिचा सत्कारही करण्यात आला. तसेच हिरापूर (तळणी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले. स्वाभिमान सबलीकरण योजना, तुषार संच पुरवठा, एच डी पी ई पाईप, ताडपत्री, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, नवीन विहीर खोदकाम, कृषी पंप इत्यादी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केलेल्या लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचलन जवाहर जोगळे यांनी केले. यावेळी प्रशांत बुले, निलेश किटे, राजू मडावी, चेतन पेंदाम, शिक्षक आणि वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result