महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा बनावी – राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी सोमवार, ०८ जानेवारी, २०१८
  • हिंदी विश्वविद्यालयाचा 20 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
  • ‘हिंदी सेवी सन्मानाने’ देश विदेशातील 8साहित्यिकांचा सन्मान
वर्धा : देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हिंदी जनमनाची भाषा व्हावी. इतर भारतीय भाषामधील बोली आणि शब्दांचा उपयोग हिंदीत केला तर ही भाषा आणखी समृद्ध होईल, असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले. ते येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या 20 व्या स्थापना दिवस समारंभात मुख्य अतिथि म्हणून बोलत होते.

विश्वविद्यालयचा 20 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साह आणि उल्हासात सोमवार, 8 जानेवारी रोजी विश्वविद्यालयाच्या अनुवाद व निर्वाचन विद्यापीठ भवनाच्या प्रांगणात भारतेंदु सभा मंडपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र होते. यावेळी खासदार रामदास तडस विशिष्ट अतिथी म्हणून तर भारतीय जनसंचार संस्था, नवी दिल्लीचे महानिदेशक डॉ. के. जी. सुरेश मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव कादर नवाज खान, प्रो. मनोज कुमार, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. देवराज, प्रो. एल. कारूण्यकरा मंचावर उपस्थित होते.

यावेळी विश्वविद्यालयाच्या वतीने मालती जोशी (मध्यप्रदेश), डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र (ओरिसा), तेजेंद्र शर्मा (लंडन), डॉ. रणजीत साहा (दिल्ली), डॉ. तात्याना ओरांसकाइया (जर्मनी), प्रो. मिलेना ब्राटोइएवा (बल्गारिया), डॉ. पी. के. बालसुब्रमण्यम (तमिळनाडु), सुरेश शर्मा (महाराष्ट्र) यांना राज्यपालांच्या हस्ते ‘हिंदी सेवी सन्मान’ प्रदान करण्यात आला.

राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी म्हणाले की, विश्वविद्यालयाचा विकास महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमि वर्धा येथे एका दृढ़ निश्चयाने होत आहे. हे विश्वविद्यालय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख सिद्ध करत आहे. वर्धेची भूमि स्वातंत्र्य संग्रामाची असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक व हेगडेवार यांच्या महान विचारांचे सिंचन येथे होत आहे.

भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्लीचे महानिदेशक प्रो. के. जी. सुरेश यांनी ‘शिक्षा का वैश्विक परिदृष्य और भारतीय शिक्षा प्रणाली’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले की, हिंदी चित्रपट देश-विदेशात लोकप्रिय आहे तशी हिंदी भाषा लोकप्रिय झाली पाहिजे. व्यवसाय, व्यापार आणि कार्यालयीन उपयोगात हिंदी आणली तर ती जागतिक स्तरावर पोहचेल. त्यांनी वर्तमान शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे व्यावसायिकरण, सरकारी प्रयत्न, पालकांची जबाबदारी, संशोधनाची गुणवत्ता, अल्पसंख्यक संस्थांना कायद्याच्या चौकटी बाहेर ठेवणे, शिक्षण क्षेत्रात बढतीचे नियम तसेच गुणवत्तेचे आव्हान यावरही आपले मत मांडले.

यावेळी खासदार रामदास तडस, कुलगुरू प्रो. गिरीशवर मिश्र यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रो. प्रीती सागर यांनी केले तर आभार कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result