महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एकमेकांच्या धर्मांविषयी आदर बाळगा - मकरंद रानडे शनिवार, ०६ जुलै, २०१९


· वाशिम पोलीस दलाचा ‘ईद मिलन’ उपक्रम
· सामाजिक सलोखा कायम राखण्याचे सर्वधर्मियांना आवाहन

वाशिम :
सामाजिक सलोखा कायम ठेवायचा असेल तर सर्व धर्मियांनी एकमेकांच्या धर्मांविषयी आदर बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी केले. वाशिम जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शुक्रवारी वाटाणे लॉन येथे आयोजित ‘ईद मिलन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. रानडे म्हणाले, काही वर्षांपूर्वी घडलेल्या अप्रिय घटनांमुळे वाशिम हा ‘संवेदनशील’ जिल्हा समजला जातो. पण सध्या जिल्ह्यातील सामाजिक सलोखा चांगला आहे. आगामी काळात होणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम, दुर्गा उत्सव तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सर्व जाती-धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घ्यावा व पोलीस दलाला सहकार्य करावे. ईद मिलनसारख्या कार्यक्रमांमुळे सर्व धर्मीय एकत्र येवून सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते. त्यामुळे दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा सर्वधर्मियांना एकत्र आणणारा असाच कार्यक्रम आयोजित करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, ईद मिलन कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम राहण्यास मदत होईल. जिल्ह्यात सध्या सौहार्दाचे वातावरण असून यापुढेही ते कायम रहावे, याकरिता सर्वधर्मीय नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकाचा धर्म हा शांततेचा संदेश देणारा आहे. हिंसाचार, असमानता याला कोणत्याही धर्मात थारा नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या धर्माचे पालन केले तर देशातील सामाजिक सलोखा कायम राहील. मात्र काही समाजकंटक जाणीवपूर्वक सामाजिक व जातीय तेढ निर्माण करून सामाजिक शांततेला बाधा पोहोचवितात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होते. ज्या देशात शांतता, कायदा व सुव्यवस्था चांगली आहे, तेथेच उद्योग, व्यवसाय यांचा विकास होतो व रोजगार उपलब्ध होतो. त्यातून देशाची व समाजाची प्रगती होते. त्यामुळे सर्वांनी जातीयवाद, धार्मिक वादाला तिलांजली देवून बंधुभाव जोपासावा, असे आवाहन करून श्री. परदेशी म्हणाले, सर्व समाज बांधवांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आपुलकी, आत्मीयता निर्माण करण्यासाठीच ईद मिलन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी खऱ्या इस्लाम धर्माची शिकवण काय आहे, याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

प्रा. जिया अहमद खान, प्रा. अब्रार मिर्झा, मौलाना अन्सार यांनी इस्लाम व कुराण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व धर्मियांनी परस्परांशी बंधुभाव कायम ठेवावा, असे आवाहन केले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता समिती व मोहल्ला समितीचे सदस्य, विविध जाती धर्मातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमीम फरहत यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक श्री. चव्हाण यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result