महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीसाठी पालघर प्रशासन सज्ज-डॉ.प्रशांत नारनवरे सोमवार, ११ मार्च, २०१९पालघर : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2019 ची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 22-पालघर (अ.ज.) मतदार संघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ.नारनवरे यांनी पालघर येथील निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने तयारीबाबत पत्रकारांशी संवाद साधला. पालघर येथे 2 एप्रिल 2019 रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून 9 एप्रिल पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 10 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होऊन 12 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास 29 एप्रिल रोजी मतदान होईल. 23 मे 2019 रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होऊन 27 मे रोजी निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे उपस्थित होते.

मतदार आणि मतदान केंद्र

डॉ.नारनवरे म्हणाले, निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 1812983 मतदार असून त्यात 949592 पुरूष, 863301 महिला तर 90 तृतीयपंथी मतदार आहेत. ज्यांना मतदानासाठी मदतीची आवश्यकता भासेल अशा 2049 दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात आली असून त्यांना आवश्यक ती मदत पुरविली जाणार आहे. निरंतर प्रक्रियेमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेणे सुरू असून त्यानंतर मतदार संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी झालेल्या मतदारांपैकी एकूण 1,03,075 इतकी मतदार छायाचित्र ओळखपत्रे प्राप्त झाली असून ती वितरीत करण्याकरीता विधानसभा मतदारसंघांकडे पाठविण्यात आली आहेत. मतदारसंघात एकूण 2120 मतदान केंद्रे आहेत, तर 6 केंद्र एकाच ठिकाणी असतील अशी एकूण 36 केंद्रे आहेत. ज्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 1400 पेक्षा अधिक होईल अशा मतदान केंद्रांबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत.

 EVM आणि VVPAT

 लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळूरू या कंपनीकडून प्राप्त झालेल्या एम 3 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये 4615 बॅलेट युनिट तर 2684 कंट्रोल युनिट आणि 2684 व्हीव्हीपॅट मशीन्सचा समावेश आहे. मशीन्सचे काम सुरळीत राहावे यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

 विविध ॲपचा वापर

या निवडणकीकरीता भारत निवडणूक आयोगाने cVIGIL हे ॲप सुरु केले आहे.  मतदार/राजकीय पक्षांना आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी या ॲपवर नोंदविता येतील. तक्रार नोंदविल्यानंतर त्यावर 100 मिनिटांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.  उमेदवारांचे नामनिर्देशन, विविध परवानग्या, मतमोजणी व मतदानाचा निकाल या संदर्भातील कार्यवाहीकरीता सुविधाहे ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे.  तर वाहन व्यवस्थापनाकरीता सुगमॲप सुरू केले आहे. तसेच मतदारांना त्यांच्या मतदार यादी संदर्भातील तक्रारी नोंदविण्याकरीता समाधानॲप सुरू करण्यात आले आहे.  मतदारांच्या तक्रार निवारणाकरीता मतदार मदत/संपर्क क्रमांक म्हणून 1950 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या निवडणुकीसाठी सुमारे 17000 अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण आणि अनुषंगिक बाबी सुरू असून महिला आणि दिव्यांग यांना जवळच्या केंद्रांवर नियुक्ती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली असून पोलीस यंत्रणाही दक्ष आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 962 प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाला दैनंदिन ताळमेळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमावर्ती भागामध्ये माहितीचे आदानप्रदान होण्यासाठी बैठक झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सर्व सूचनांबरोबरच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असेही डॉ.नारनवरे यांनी स्पष्ट केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result