महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- राहुल रेखावार सोमवार, ११ मार्च, २०१९


धुळे
: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून २७ मे २०१९ पर्यंत आचारसंहिता लागू राहील. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे आदी उपस्थित होते.

श्री. रेखावार म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून अहवाल सादर करावेत. आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी e Vigil या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर १०० मिनिटात कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे आदी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी PwD App या ॲपचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले, शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर करू नये. शासन, सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, आदींचा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटिशी चिटकवणे किंवा घोषणा आदी लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खासगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल, असेही त्यांनी नमूद केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भामरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यालयात व्होटर अवरनेस फोरम कार्यान्वित करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result