महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कलापथकांचे कार्य रविवार, १२ मार्च, २०१७
सांगली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कलापथकांचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती गरजू, होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावी, या हेतूने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केले आहे.

हे कार्यक्रम 10 मार्चपासून सुरू झाले असून, ते 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या गीत व नाट्य विभागाच्या यादीवरील जिल्ह्यातील 8 कलाथकांचा समावेश आहे. ही कलापथके आपल्या सादरीकरणातून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती तालुकानिहाय देत आहेत. हे सादरीकरण सकाळी किंवा सायंकाळी विविध गावांमध्ये होत आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने मा. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहीत केले जाते. या योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी शिशु गट 10 हजार ते 50 हजार, किशोर गट 50 हजार ते 5 लाख, तरूण गट 5 लाख ते 10 लाख या तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे. यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इत्यादी लहान स्वरूपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील कर्ज देण्याची तरतूद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहील. याबाबतची माहिती ही कलापथके आपल्या सादरीकरणातून देत आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result