महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी आदर्श आचारसंहिता समन्वय कक्ष दक्ष - डॉ.प्रशांत नारनवरे शुक्रवार, २६ एप्रिल, २०१९
पालघर : लोकसभेच्या पालघर मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विविध पथके कार्यरत आहेत. यामध्ये आदर्श आचारसंहिता समन्वय कक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून या माध्यमातून निवडणूक विषयक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. मद्य व अंमली पदार्थांसह ३ कोटी २७ लाख ६५ हजार ५०६ रुपये किमतीचा मुद्देमाल आणि चार लाख २० हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदानापूर्वीच्या ४८ तासात मतदारसंघाबाहेरील व्यक्ती मतदारसंघात येणार नाही याबाबत दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भरारी पथक, स्थायी पथक, व्हीडिओ पथक आदींच्या माध्यमातून आचारसंहिता पालनाबाबत विधानसभा मतदारसंघनिहाय दक्षता घेतली जात आहे. या पथकांमध्ये २८ भरारी पथके, ४२ स्थिर सर्व्हेक्षण पथके, २३ व्हीडिओ शुटींग पथके तर आठ व्हीडिओ पाहणारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात एकूण २१ चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. यामध्ये डहाणू मतदारसंघात उधवा, आच्छाड, आणि झाई असे तीन, विक्रमगड मध्ये निळमाती, मस्ताननाका, खंबाळे, विहिगाव आणि तळवाडा असे पाच, पालघर मध्ये चारोटी नाका, कोळगाव, केळवा सागरी मार्ग आणि वाघोबा खिंड असे चार, बोईसर मध्ये टेन नाका, वसई फाटा आणि चिल्लार फाटा असे तीन, नालासोपारा मध्ये ओलांडा, वसंत नगरी, विरार फाटा (पिरकुंडा) असे तीन तर वसई मतदार संघात भुईगाव, गोखिवरे आणि चिंचोटी अशा तीन चेक पोस्ट चा समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामपातळीवर देखील ७६९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्रामसेवक, कृषी सहायक व पोलीस पाटील यांचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील १७४, विक्रमगड तालुक्यात ९२, पालघर मध्ये २१२, वसई मध्ये ४९, जव्हार मध्ये १०९, मोखाडा मध्ये ५६, तलासरी मध्ये ४१ तर वाडा तालुक्यातील ३६ समित्यांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात १०७ व्हीडिओग्राफर्स विविध पथकांसोबत तैनात आहेत. याशिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय सहा तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली असून या तपासणी पथकामार्फत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने हॉटेल, रिसॉर्ट, मंगल कार्यालय, वाईन शॉप, बिअर शॉप, मटन शॉप, मच्छिमार सोसायटी, लॉजिंग आणि बोर्डिंग, खाद्यगृह आदी विविध ठिकाणांसह सर्वत्र नजर ठेवली जात आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result