महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे – विभागीय आयुक्त जयस्वाल बुधवार, २६ जून, २०१३
औरंगाबाद : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करून या कल्याणकारी योजना सर्व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

तापडिया नाट्य मंदिर येथे समाज कल्याण आयुक्तालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, औरंगाबाद यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सभापती रामनाथ चोरमले, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, प्रादेशिक आयुक्त आर.यु.राठोड, सहाय्यक आयुक्त जयश्री सोनकवडे, प्रदीप साळंके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री.जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाज घडविण्यात अनेक महापुरुषांचे मोठे योगदान आहे. सामाजिक न्याय दिन व समता दिंडी यासारख्या कार्यक्रमांमुळे महापुरुषांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होते. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या योजनांबाबत अधिक जनजागृती करण्यात यावी. सध्याचे युग स्पर्धात्मक असल्याने विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता प्रत्येक ठिकाणी सिद्ध करावीच लागेल. यासाठी संकल्पपूर्वक व आत्मविश्वासाने काही वेगळे करुन दाखविण्याची धमक विद्यार्थ्यानी अंगी बाळगावी. ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्‍यांनी केले.

श्री.बनकर म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी व कष्टकरी यांचे हित जोपासले. समाजातील दुर्बल घटकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. डॉ.कांबळे यांनी, राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते तसेच ही संकल्पना त्यांनी समाजातही रुजवल्याचे सांगितले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन करून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी, असा सल्लाही त्‍यांनी दिला. महामानवांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होण्यासाठी सामाजिक न्याय दिनासारख्या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, जलव्यवस्थापन यासह सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविल्याचे प्रदीप साळुंके म्हणाले. अज्ञानामुळे समाजाचे मोठे नुकसान होते हे समजून घेण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याचे श्रीमती सोनकवडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी सावित्रीबाई फुले गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील व जी पॅट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे वाचनही यावेळी  करण्यात आले.

राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त समतादिंडी

समाज कल्याण आयुक्तालय व सहाय्यक आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांच्या वतीने राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समतादिंडीचे आयोजन करण्यात आले.

समता दिंडीचा प्रारंभ भडकल गेट येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण  करुन झाला. यावेळी समाज कल्याण सभापती रामनाथ चोरमले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, प्रादेशिक आयुक्त आर.यु.राठोड, सहायक आयुक्त जयश्री सोनकवडे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिलकॉर्नर येथे राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

समता दिंडी मिलकॉर्नर, औरंगपुरामार्गे काढण्यात आली. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीचे विसर्जन करण्यात आले. समता दिंडीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात शाहू महाराजांना अभिवादन

राजर्षिे शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

अपर आयुक्त गोकुळ मवारे, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, उपायुक्त धनराज केंद्रे, व्ही.व्ही.गुजर, विजयकुमार फड, जितेंद्र पापळकर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी शाहू महाराजांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली.
Share बातमी छापा