महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बीड : लोकसहभागामुळे अमृता नदी बहरली ! सोमवार, ०९ नोव्हेंबर, २०१५
विशेष लेख...

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या खळेगाव येथील ग्रामस्थांचे फार मोठे कौतुक होत आहे. सातत्याने पाण्याअभावी तहानलेल्या बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांना पाण्याच्या उपलब्धतेचे महत्व खूप आहे. त्यामुळे खळेगाव येथे घडलेले लोकसहभागातून नदीपात्राचे खोलीकरणाचे काम इतरांना प्रेरणादायी ठरते आहे.


मागील दोन महिन्यात खळेगाव येथील अमृता नदीपात्राचे एक किलोमीटरपर्यंत खोलीकरण, रुंदीकरण, गाळ उपसा ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसभागातून केला. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे नदीपात्रात पाणी साचले. गावाचा पाणीप्रश्न मार्गी लागण्यास आता मदत झाली आहे. त्यामुळे गाव करील ते राव काय करील याचा प्रत्यय खळेगावकरांच्या सामुदायिक प्रयत्नातून पुढे आला आहे.

प्रशासनाने खळेगाव येथील अमृता नदीतील गाळ काढावा, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती. मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खळेगावचे ग्रामस्थ सरसावले आणि याबाबत हनुमान मंदीरात बैठक घेण्यात येऊन लोकवर्गणी जमा करुन नदीचे खोलीकरण केले. यातूनच त्यांनी गाळ उपसण्याचा निर्धार केला. त्यानुसार 20 ऑगस्ट रोजी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थितीत नदी खोलीकरण आणि गाळ उपशाच्या कामास सुरुवात करण्यात आली.

काही दिवसांतच एक किलोमीटर अंतरापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्याचे काम करण्यात आले. लोकवर्गणीतून नादुरुस्त अवस्थेतील बंधाऱ्यास सहा ते सात फूट उंचीची भिंत बांधण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खळेगावकरांच्या चेहऱ्यावर आनंदमय वातावरण पसरले आहे.

स्वत: ग्रामस्थांनी प्रश्न सोडविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी अमृता नदीपात्रातील पाणी पावसाळ्यात वाहून जात होते. परिणामी या भागातील पातळी खालावल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. ग्रामस्थांनीच प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ एकत्रित आले आणि लोकवर्गणीतून नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ उपसा करीत बंधाऱ्यास भिंतही बघायला मिळत आहे.

-अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड.
Share बातमी छापा