महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दैठणा व पोरवड येथे शेततळ्यांची कामे वेगात सुरू शनिवार, ०५ सप्टेंबर, २०१५
परभणी : जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत परभणी तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळ्यांची कामे वेगात सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेततळी उपलब्ध होणार आहेतच याबरोबरच मजुरांच्या हातालाही कामे मिळत आहे.

परभणी तालुक्यातील पोरवड येथे महेश गिराम या शेतकऱ्याच्या शेतात शेततळ्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. के. दिवेकर, गटविकास अधिकारी श्री. गोपाळ, तालुका कृषी अधिकारी पी. पी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. महिवाल म्हणाले, रोजगार हमी योजनेअंतर्गत गावाच्या विकासासाठीची विविध कामे घेता येतात. याद्वारे रोजगार निर्मितीही होते. `रोहयो`तून विहिरी व शेततळ्याची कामे प्राधान्याने घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

श्री.रूईकर म्हणाले, शेततळ्याची कामे करण्यासाठी मजुरांनी गट तयार करून पुढे यावे. या कामातून मजुरांसाठी रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांना नक्कीच दिलासा मिळेल.

परभणी तालुक्यातील दैठणा येथेही श्री. महिवाल यांनी शेततळ्याच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकरी, मजुरांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्व पटत असल्याने शेतकऱ्यांकडून शेततळ्याची मागणी होत असल्याची बाब नक्कीच सामाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Share बातमी छापा