महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
`लोकराज्य` मासिक हे ज्ञानाचे भांडार - डॉ. शिवाजी साठे बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
बारामती : स्पर्धा परीक्षेसाठी `लोकराज्य`हे मासिक अत्यंत उपयुक्त असून ते ज्ञानाचे भांडार असल्याचे प्रतिपादन तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. शिवाजी साठे यांनी केले.

आज तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहात आयोजित `लोकराज्य वाचक मेळावा` कार्यक्रमात डॉ. शिवाजी साठे बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी संग्राम इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, प्रा. विलास कर्डीले उपस्थित होते.

डॉ. शिवाजी साठे म्हणाले, वाचनाने माणूस समृध्द होतो. शासनाचे मुखपत्र असणारे लोकराज्य हे मासिक दर्जेदार असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी वाचन महत्त्वाचे असते, ही ज्ञानाची भूक भागविण्याचे काम लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून होते.

मोहन राठोड म्हणाले, लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. लोकराज्यच्या माध्यमातून शासनाचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक दिशादर्शकाची भूमिका निभावते. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी लोकराज्य मासिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हाच लोकराज्य वाचक मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंद्र सरग म्हणाले, लोकराज्य मासिकाला सत्तर वर्षांची परंपरा आहे. अनेक दिग्गज लेखकांचे विविध विषयांवरील लेख लोकराज्यच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. लोकराज्य विशेषांकांच्या माध्यमातून वाचकांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावते.

ज्ञानेश भुकेले यांनी लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सारिका कळसकर, गीता वरकुटे यांनी केले. आभार संग्राम इंगळे यांनी मानले.

यावेळी प्रा.एस.आर.काळे, प्रा. जयेंद्र राणे, रणजीत पंडीत, जयप्रकाश पाटील, डॉ. राऊत, प्रा. विनायक लष्कर, राजश्री आगम, प्रा. संजय भिसे, उप माहिती कार्यालयाचे प्र.माहिती सहायक विलास कसबे, विशाल कार्लेकर, सूर्यकांत कासार, नरेंद्र वासनिक, अमीत खडतरे, भीमराव गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा