महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदिवासी बांधवांना गावातच रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न व्हावेत - प्रवीण परदेशी शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
सातपुड्याच्या दुर्गम भागातील गारखेडे व निमडया गावातील आदिवासींशी साधला संवाद

जळगाव :
वनक्षेत्रातील आदिवासी बांधवांना त्यांच्या गावाच्या परिसरातच रोजगार उपलब्ध होईल यासाठी आदिवासी व वन विभागाने प्रयत्न करावा, अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी आज दिल्या.

श्री.परदेशी यांनी आज पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील वनक्षेत्रातील गारखेडे व निमड्या या गावांना भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, वनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक एन. आर. प्रवीण, श्री.शेजल, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, संजय दहिफळे, पाल प्रशिक्षण केंद्राचे दिलीप भवर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) डी. आर. पाटील, अश्विनी खोपडे, रावेर परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, श्री.सोनवणे, श्री.पाटील, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.परदेशी यांनी जंगलतोड रोखण्यासाठी वनक्षेत्रातील आदिवासी कुटुंबाना आदिवासी योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या. त्याचबरोबर अंजनाच्या झाडाचा पाला जनावरांना खाण्यासाठी तोडताना झाडेही तोडली जातात. ही वृक्षतोड थांबविण्यासाठी कुटुंबातील जनावरांच्या संख्येनुसार त्यांना झाडाचे वाटप करावे. या झाडांचे संरक्षण व देखभाल त्याच कुटुंबाने करावी अशा सुचनाही त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर पालसारख्या जंगलात ट्रेकींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसा रस्ता बनविला तर याठिकाणी ट्रेकिंगसाठी पर्यटक येतील यातून आदिवासींना रोजगार मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. नरेगा, पेसा व व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन मधून निधी उपलब्ध करुन या गावांचा विकास साधण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

गारखेडे व निमड्या गावातील आदिवासीशी साधला संवाद
यावेळी श्री.परदेशी यांनी गारखेडे गावातील नागरीकांशी संवाद साधताना श्री.परदेशी यांनी गेल्या तीन वर्षात तुमच्या गावात काय सुधारणा झाल्या असे विचारले असता एका ग्रामस्थाने लगेचच कॉक्रींटच्या रस्त्याकडे हात करुन हे काम (सिमेंट कॉक्रींटचा रस्ता) झाल्याचे सांगितले. तसेच जंगलात नवीन अतिक्रमण होत आहे काय विचारल्यावर जंगल आमचे आहे, आम्हीच अतिक्रमण रोखत असल्याने अतिक्रमण होत नाही असे ग्रामस्थ म्हणाले.

तर निमड्या गावात गेल्याबरोबर त्यांनी आवास योजनेतील घरकुलाची पाहणी केली व घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला असेलच असे विचारताच ग्रामस्थाने दुसरा हप्ता पण मिळाला साहेब असे उत्स्फुर्तपणे सांगितले. अंजन वृक्षाची माहिती घेताना त्याचा पाला कशासाठी वापरता, पाला तोडताना झाडे पण तोडतात का असे विचारले असता ग्रामस्थांनी जनावारांना खाण्यासाठी वापरतो, झाडे तोडली तर पाला कुठून मिळणार असा प्रतिपश्न केला. त्याचबरोबर काही तरुणांना तुमच्या लहानपणी जंगल कसे होते. ते अजून चांगले राहण्यासाठी काय केले पाहिजे असे विचारताच एका तरुणाने घनदाट असल्याचे सांगितले. तसेच जंगालाचे संरक्षण आमचीच जबाबदारी असल्याने ते आम्ही करणार असल्याचेही तरुणाने सांगितले.

यावेळी श्री. परदेशींनी संवाद साधताना ग्रामस्थाना जंगलाचे महत्व पटवून सांगितले. व जंगलाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

लांडोरखोरी उद्यानाला दिली भेट

जळगाव शहरालगत वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी वन उद्यानास श्री. परदेशी यांनी भेट दिली. उद्यान बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरीकांना जॉगिंगसाठी अजून एक ट्रॅक सुरु करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा