महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उमेदवारांच्या निवडणूक प्रचारावर भारत निवडणूक आयोगाचे लक्ष : मुख्य निवडणूक निरीक्षक अलककुमार सहारिया मंगळवार, २३ एप्रिल, २०१९धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 02- धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या प्रचारावर भारत निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असून उमेदवारांनी संयम बाळगत प्रचार करावा. गैरवर्तन केल्यास भारत निवडणूक आयोगातर्फे कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक निरीक्षक अलककुमार सहारिया यांनी येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी बाबूलाल पाटील आदी उपस्थित होते.

 

मुख्य निवडणूक निरीक्षक श्री.सहारिया म्हणाले, की 02- धुळे लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनातर्फे निवडणुकीची परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 70 लाख रुपयांची मर्यादा आहे. भरारी पथके, दक्षता पथके आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांनी खर्च तपासणी अहवाल वेळेत सादर करावा.

 

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. उमेदवारांनी आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, अशा पद्धतीने प्रचार करावा. प्रत्येक मतदारापर्यंत व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, व्होटर स्लीप मतदानासाठी ओळखीचा पुरावा ठरणार नाही. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 पुराव्यांपैकी एक पुरावा मतदान करताना सादर करावयाचा आहे.  मतदान कक्षात मोबाईलसह इलेक्ट्रॉनिकची कोणतीही साधने घेऊन जाण्यास परवानगी नाही. मतदार यादीत नाव असेल, तरच मतदान करता येईल.

 

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर उमेदवाराला मंडप टाकता येईल. त्यासाठी परवानगीची विहित प्रक्रिया पार पाडावी लागेल. तसेच या मंडपाभोवती गोंधळ, गर्दी होणार नाही याची दक्षता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीने घ्यावयाची आहे. मतदान केंद्रांत नेमावयाच्या प्रतिनिधीच्या नियुक्तीसाठी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भामरे म्हणाले, उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिनीवरुन प्रसारित केली असेल, तर त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा