महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अंड्याबाबत सर्व काही... ! गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
विशेष लेख...

‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे,’ ही नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीची जाहिरात तशी सगळ्यांच्याच परिचयाची. या जाहिरातीत प्रत्येकाने रोज एक तरी अंडे खावे असे आवाहन करण्यात येते. मात्र, राज्यातील प्रत्येक नागरिकाने खरोखरच अंडे खाणे सुरू करावे का ? यासाठी आपण अंड्याबाबत सर्व काही जाणून घेवूया... ! निमित्तही तसेच आहे १३ ऑक्टोबर हा दिवस जगभर जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर मग अंड्याविषयी सब कुछ जाणून घेवू, अंडी खाऊ व आरोग्य सुधारुया...

मानवी आहारामधील अंड्याचे महत्व

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्वे असतात. ब,क,ड, ई, के इत्यादी जीवनसत्वे असतात. अंड्यामध्ये प्रथिनाचा मोठा स्त्रोत असून जवळपास सहा ग्रॅम प्रथिन (प्रोटिन) आढळते. निरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड अंड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. शरीरास पोषणास आवश्यक असलेले नऊ प्रकारचे ॲमिनो ॲसिड असल्यामुळे अंडी परिपूर्ण आहार समजले जाते. मेंदू आणि चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी पूरक पोषण घटक अंड्यामध्ये आहेत. दैनंदिन आहारात शिफारस केलेल्या एकूण कोलीनपैकी 20 टक्के कोलीन हे अंड्यात असते. मेंदू पेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक फॉस्फोलिपीडस हे कोलीनमुळे मिळते. ट्रिप्टोफन आणि ट्रायरोसीन हे निद्रा हितकारक घटक अंड्यात असतात. यात अमोनिया ॲसिड ॲन्टी ऑक्सीडंट गुणधर्म आहेत. ट्रिप्टोफॅन हे सेरोटोनिन आणि मॅनोटोनिन यामध्ये रुपांतरीत होऊन त्याचा मानवाच्या मनाला कल आणि झोप यावर चांगला परिणाम घडवून आणते. एका अंड्यामध्ये 50 मिलीग्रॅम कॅल्शिअम असते. त्यामुळे अंड्याच्या सेवनाने कॅल्शिअमची कमतरता भरुन निघते.

अंड्यातील कोलीन हे घटक शरीरात निर्माण होणारे दाह कमी करीत असल्याने हृदय रोगाची जोखीम कमी करते. शरीराची झीज होताना येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी अंड्यातील सेलीनियम हे सूक्ष्म पोषक मुलद्रव्य उपयोगी आहे. दैनिक आहारात जीवनसत्व डी स्त्रोताची 600 आय.यु. आवश्यक असून त्यापैकी 41 आयु.यु. हे एका अंड्यातून मिळतात. अंड्यातील पेप्टाईलमुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. आहारातील अंड्याच्या समावेशामुळे मानवी रक्तातील घातक कोलेस्टोरॉलचे (एलडीएल) प्रमाण कमी होऊन आवश्यक कोलेस्टोरॉल प्रमाण वाढते. डोळ्याच्या आरोग्यासाठी कॅरिटनाईट घटक आहारात समावेश असणे आवश्यक असते. ल्युटीन आणि झेक्सॅथिंन ही कॅरेटेनॉईड्स फ्री रॅडीकलपासून होणारी डोळ्याची हानी थांबवू शकतात.

अंड्यात असलेल्या ल्युटिन आणि झेक्सेथिंग या घटकामुळे वयोमानामुळे होणारी डोळ्याची झिज रोखू शकते. निरोगी केसांची वाढ व नखांसाठी आवश्यक घटक अंड्यात आहेत. सल्फर, जीवनसत्वे, मुलद्रव्ये हे केस निरोगी राखतात. अल्ट्राव्हायलेट किरणाने होणारे डोळ्याचे वाईट परिणामाला प्रतिबंध करते. वयपरत्वे होणारा मोतीबिंदुसारख्या दृष्टिदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते. प्रोस्टेड ग्रंथीची वाढ/गाठ निर्माण होऊ नये / कर्करोग यास प्रतिबंध करणारे सेलेनियम हे घटकद्रव्य अंड्यामध्ये आढळते. मुडदूस, अल्झायमर, हाडाची ठिसुळता आणि दोन प्रकारचे मधुमेह याची जोखीम अंड्यातील कोलीन या घटकामुळे कमी होते. रक्तात होणाऱ्या गाठी आणि हृदयविकार याची जोखीम कमी करणारे घटक अंड्यात आहेत.

ताजी अंडी व शिळी अंडी पाण्यात सहज ओळखू येतात. पातेल्यातील पाण्यात आडवी झाले तर ताजे आहे, उभे राहिले तर कमी ताजे आहे. तरंगु लागले तर नक्की शिळे आहे. ते खाऊ नये. फार कोरडी नाही अशा जागेवर अंडी रुंद भाग जमिनीकडे करुन ठेवावेत. अंडी फ्रिजमध्ये असल्यास खाद्य पदार्थ करण्यापूर्वी गरम पाणी ओतावे. अंडी मंद अग्नीवर शिजवावे. अंडी भांड्यामध्ये पाण्यात ठेवा आणि उकडल्यानंतर आग कमी करुन दहा मिनिटे ठेवा. अंडी अकडल्यानंतर ती अंडी थंड पाण्यात बुडवा आणि झपाट्याने थंड होऊद्या. असे केल्याने अंड्याचा पिवळा व पांढरा भाग यांच्या दरम्यान काळसर वर्तुळ येत नाही.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अंडी खाण्याबाबत जनजागृती केली जात आहे. काही योजनेतून अंडी उत्पादक लघू उद्योगासाठीही प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेवटी एकच की ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे,’ हाच मंत्र आपल्या आरोग्यासाठी खराच लाभदायक आहे.

-अनिल आलुरकर,
जिल्हा माहिती अधिकारी, परभणी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा