महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा - पोलीस निरीक्षक रणदिवे शनिवार, ०४ जानेवारी, २०२०


नंदुरबार -
महिलांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे प्रतिपादन नंदुरबार सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केले. नंदुरबार जिल्हा पोलिसांमार्फत डी. आर. हायस्कुल येथे आयोजित ‘सायबर सेफ वूमन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाडकर, डी.आर. हायस्कुलचे उपप्राचार्य एस.व्ही. चौधरी, प्रा. एम.एल. अहिरराव, निशिकांत शिंपी, उमेश शिंदे, दामिनी पथक प्रमुख रोहिणी धनगर, मीना पवार आदी उपस्थित होते.

श्री. रणदिवे म्हणाले, महिलांची सुरक्षा हा विषय अत्यंत संवेदनशील बनला असून त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांनी दैनंदिन जिवनात इंटरनेटशी संबंधित सर्व ॲप्स वापरताना दक्षता घ्यावी. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीला पाठवू नये. इंटरनेटवरील फसव्या संदेशापासून सावध राहावे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिसांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाडकर यांनी मोबाईल विविध ॲप वापरामुळे मुलींची व महिलांची होणारी फसवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी ऑनलाईन संवाद, सोशल इंजिनियरिंग, फिशिंग, नोकरीचे लाभ दाखवून होणारी फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, बँकिंग विषयक फसवणूक व्हॉट्सॲप, फेसबुक प्रोफाईल फोटोंचा गैरवापर, चाईल्ड पोर्नोग्राफी, सायबर ग्रुमिंग, सायबर बुलींग, मार्फिंग, ऑनलाईन हालचालींचा पाठलाग, ऑनलाईन गेमिंग मुले व महिलांची सुरक्षा आदी विषयांवर पोलीस निरीक्षक श्री. रणदिवे यांनी पीपीटीद्वारे सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास डी.आर. हायस्कुलचे शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा