महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या ‘पारसी गारा ॲम्ब्रॉयडरी’ हुनर हाटचे दिल्लीकरांना आकर्षण बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८
नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने येथील बाबाखडकसिंह मार्ग भागात आयोजित हुनर हाट प्रदर्शनात पनवेल (मुंबई) येथील झिनोबिया डावर यांच्या पारसी गारा ॲम्ब्रॉयडरी साड्या, साडी बॉर्डर्स, फ्रेम्स दिल्लीकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

बाबाखडकसिंह मार्ग भागात हुनर हाट प्रदर्शनास सुरुवात झाली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विविध राज्यातील हस्तकला व खाद्यपदार्थांचे एकूण १०० स्टॉल्स याठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्यावतीने येथे स्टॉल क्रमांक सी-४३ हा पारसी गारा ॲम्ब्रॉयडरीचा स्टॉल उभारण्यात आला असून हा वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल दिल्लीकर कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.

पनवेल येथील हस्तकलाकार झिनोबिया डावर यांच्या पारसी ॲम्ब्रॉयडरी स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण साड्या, साडी बॉर्डर्स आणि फ्रेम्स हुनरहाटमध्ये येणाऱ्‍या प्रत्येकाला आकर्षित करीत आहेत. गेल्या १८ वर्षांपासून गारा ॲम्ब्रॉयडरीची कला जोपासताना ही कला जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण या प्रदर्शनात सहभागी झाल्याचे झिनोबिया सांगतात. विशिष्ट मलबारी सिल्क कापडावर कॉर्बीडन शिवण घेऊन तयार करण्यात आलेल्या साड्या येथे आहेत. येथे बजेट गारा आणि फुल गारा अशा दोन प्रकारच्या साड्या विक्रीस आहेत. रूपये ३६ हजार ते ६० हजार किंमतीच्या बजेट गारा साडी व टॉप्स आणि १ लाख २० हजार रुपयांची फुल गारा साडीही या ठिकाणी आहे. याशिवाय ३ इंच रुंद व ७ मिटर लांबीच्या व २० हजार रूपये किंमतीच्या सुरेख साडी बॉर्डर तसेच ९ ते ५४ हजार रूपये किंमतीच्या वैशिष्ट्यपूर्ण फ्रेमही या ठिकाणी आहेत.

हुनर हाटमध्ये २२ राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील अल्पसंख्यांक समाजातील हस्तकलाकार सहभागी झाले असून याठिकाणी एकूण १०० स्टॉल्स उभारण्यात आली आहेत. दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान हुनरहाटला भेट देता येणार आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा