महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले अभिवादन शनिवार, १४ एप्रिल, २०१८
अकोला : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी अभिवादन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आज पिढीने जीवनात प्रामाणिकपणे वाटचाल करावी, असे आवाहन करीत पालकमंत्री यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनीही यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अशोक वाटिका परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासही सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

पालकमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे. या महामानवाचा आपल्या देशात जन्म झाला, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असा मूलमंत्र देत त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी शिकलेच पाहिजे, असा संदेश देत शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. आमदार बळीराम सिरस्कार व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनीही सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा