महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील- गुलाबराव पाटील सोमवार, २१ मे, २०१८
दिव्यांग व्यक्ती समाजाच्या महत्वपूर्ण घटक

जळगाव :
दिव्यांग व्यक्ती हा सुद्धा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक ते साहित्य उपलब्ध करुन दिल्यास त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी निश्चितच मदत होईल, ही भावना मनात ठेवून प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

श्री.पाटील यांच्या स्थानिक विकास निधी व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून धरणगाव व जळगाव ग्रामीण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनार्थ इंडियन रेडक्रॉस सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या जिल्हा पुनर्वसन केंद्राच्यामार्फत मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर व साहित्य वाटपाचा कार्यक्रम धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात श्री.पाटील यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सलीम पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूरकर, तहसीदार श्री.राजपूत, गटविकास अधिकारी सुभाष जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जयकर, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.सोनवणे, पंचायत समिती उपसभापती त्र्यंबक पाटील, जिल्हाप्रमुख गुलाब वाघ, अंजलीताई बावीस्कर, नानाभाऊ सोनवणे यांचेसह इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शासन समाजातील सर्व घटकांच्या विकासास प्राधान्य देत आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 10 टक्के रक्कम दिव्यांगाच्या विकासासाठी खर्च करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार प्रथमच या निधीतून दिव्यांगाना साहित्याचे वाटप करण्यात येत असून यापुढील काळात दरवर्षी दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात येईल. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असल्याने दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात येते. धरणगाव व जळगाव तालुक्यातील गरजू नागरीकांना मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये नेऊन आतापर्यंत 70 नागरीकांच्या ॲन्जीओप्लास्टी तर 22 रुग्णांच्या बायपास सर्जरी केल्या आहेत. तर मागील महिनाभरात 23 कँन्सर रुग्णांना जीवनदायी योजनेतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर धरणगाव तालुक्यातील तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्या यासाठी नगरपालिकेच्यावतीने स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाणार आहे. तालुक्यातील 1 हजार तरुणांची निवड चाचणी घेऊन त्यातून 100 हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना एमपीएससी/ युपीएससी परिक्षेच्या धर्तीवरील अभ्यासक्रम शिकविले जाणार आहे. यावेळी श्री.पाटील यांनी दिव्यांगांना साहित्य वाटपासाठी दिव्यांगांची माहिती मिळविण्यासाठी तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, मुक्ती फाऊंडेशन यांनी मदत केल्याबद्दल आपल्या भाषणात त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी श्री.पाटील यांच्या हस्ते 300 दिव्यांग व्यक्तींना जयपुर फुट, कॅलिबर्स, पांढरी काठी, सायकल, कर्णयंत्र आदी 22 प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलापूरकर, गनी मेमन, अंजली बाविस्कर, गुलाब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व धन्‍वतंरीचे प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुनर्वसन केंद्राचे समन्वयक गणेशकर यांनी केले.

कार्यक्रमास राजेंद्र महाजन, विलास महाजन, नगरसेवक रावसाहेब पाटील, कमलेश बोरसे, शिरीष चौधरी, सरला महाजन, डॉ. प्रसन्ना रेदासनी, राजेश यावलकर, डॉ.चव्हाण यांचेसह आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच दिव्यांग व्यक्तींचे नातेवाईक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा